निकालावर हौशी रंगकर्मींचा आक्षेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 01:40 AM2018-12-11T01:40:39+5:302018-12-11T01:41:03+5:30
नाशिकमध्ये ५८व्या हौशी राज्य नाट्य स्पर्धा नुकतीच पार पडली असून, या स्पर्धेचा निकाल सोमवारी (दि. १०) जाहीर झाला. त्या संपूर्ण निकालावर बहुतांशी नाट्य संघांनी आक्षेप घेतला आहे.
नाशिक : नाशिकमध्ये ५८व्या हौशी राज्य नाट्य स्पर्धा नुकतीच पार पडली असून, या स्पर्धेचा निकाल सोमवारी (दि. १०) जाहीर झाला. त्या संपूर्ण निकालावर बहुतांशी नाट्य संघांनी आक्षेप घेतला आहे. विशेष म्हणजे नाट्य परिषद नाशिक शाखा आणि मध्यवर्ती शाखा यांनी नाशिकच्या निकालात मोठ्या प्रमाणात ढवळाढवळ केली आहे.
यासंबंधी हौशी रंगकर्मींनी पत्रकार परिषद घेऊन राज्य नाट्य स्पर्धेच्या निकालाबाबत आक्षेप घेत निषेध नोंदविला. राज्य नाट्य स्पर्धा ही खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. परंतु निकाल पूर्णपणे पक्षपाती लागला आहे. आम्ही या गोष्टीचा तीव्र शब्दात निषेध करतो, असे स्पष्ट केले. अशाप्रकारे जर निकाल लागत राहिला तर नाशिकच्या नाट्य चळवळीचे नुकसान होईल. पैसे खर्च करून मेहनत घेऊन प्रामाणिकपणे नाटक करणारी हौशी मंडळी स्पर्धेपासून दूर जाईल, म्हणूनच एकूणच निकालाविषयी आम्हाला साशंकता असून, आम्हाला सदरचा निकाल मान्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी हेमंत गव्हाणे, रोहित पगारे, सुधीर कुलकर्णी, कुंदन गायधनी, अर्पणा क्षेमकल्याणी, धनजंय वाबळे, भैरव मालपाठक, पूनम देशमुख, बाळकृष्ण तिकडे, हेमा जोशी, सुयोग देशपांडे, पल्लवी पटवर्धन, वरुण भोईर उपस्थित होते.
वशिलेबाजी
नाट्य परिषदेवर सक्रिय असणारी मंडळी नाट्य स्पर्धेच्या निकालावर जर अशाप्रकारे प्रभाव टाकत असतील, तर नाट्य परिषदेने त्यांच्या पदाधिकाऱ्यांसाठीच केवळ स्पर्धा घ्यावी, असे स्पष्ट करीत ही स्पर्धा आणि निकाल पूर्णपणे चुकीचा आदी वशिलेबाजी करून लावलेला आहे, अशा आरोपही यावेळी रंगकर्मींनी केला.