नाशिकच्या अंबड लिंकरोडवर भंगार बाजार पुन्हा वसण्याचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 11:36 AM2017-12-09T11:36:57+5:302017-12-09T11:37:07+5:30
नाशिक : सातपूर-अंबड लिंकरोडवरील भंगार बाजार हटविण्याची कारवाई महापालिकेने केली असली तरी, पुन्हा एकदा भंगार बाजार वसण्याची भीती प्रभागाचे नगरसेवक भागवत आरोटे यांनी आयुक्तांकडे एका पत्रान्वये केली आहे. सदर भागात बांधकामांना देण्यात येणाºया परवानग्या तपासण्याचीही मागणी आरोटे यांनी केली आहे.
आयुक्तांना दिलेल्या पत्रात आरोटे यांनी म्हटले आहे, सद्यस्थिती पाहता मागील दाराने पुन्हा एकदा भंगार बाजार वसण्याचा धोका निर्माण झाला आहे. सदर भागात अनेक भूखंडांवर बांधकामाची परवानगी घेऊनही अनेकांनी बांधकाम पूर्णत्वाचा दाखला घेतलेला नाही. संबंधित इमारतींचे बांधकाम नकाशे तपासल्यास काही इमारती या मनपाने दिलेल्या परवानगीनुसार बांधलेल्या नाहीत तसेच काही इमारतींचा वापर अनधिकृतपणे भंगार बाजारासाठी होताना दिसून येत आहे. अनेकांनी इमारतींमध्ये भंगार बाजाराची दुकाने थाटलेली आहेत, तर काही ठिकाणी मोकळ्या भूखंडांवर कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता अनधिकृतपणे भंगार साहित्याचे दुकाने सुरू आहेत. प्रशासनातील काही अधिकारी व नगररचना विभागाच्या दुर्लक्षामुळेच पुन्हा भंगार बाजार वसण्याचा धोका निर्माण झाला आहे. आयुक्तांनी भंगार बाजाराच्या ठिकाणी देण्यात आलेल्या बांधकाम परवानग्यांसंबंधीचा अहवाल मागवून चौकशी करावी आणि कारवाई करावी, अशी मागणीही आरोटे यांनी केली आहे.