लागोपाठ दोन खूनांनी अंबड हादरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:31 AM2021-09-02T04:31:54+5:302021-09-02T04:31:54+5:30
सिडको : गेल्या काही दिवसांपासून अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारीत वाढ झाली असून, महिनाभराच्या कालावधीतच दोन खून झाल्याने नागरिकांमध्ये ...
सिडको : गेल्या काही दिवसांपासून अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारीत वाढ झाली असून, महिनाभराच्या कालावधीतच दोन खून झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गुन्हेगारीबरोबरच रोलेट या ऑनलाईन जुगाराच्या खेळामुळे सिडकोसह अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले असून, याकडेही पोलिसांनी गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
सिडकोतील स्टेट बँक चौपाटीजवळ एका तरुणाचा खून झाल्याची घटना ताजी असतानाच अंबड येथील कारगिल चौक भागात मंगळवारी रात्रीच्या सुमारास जुन्या भांडणाची कुरापत काढून राहुल गवळी या तरुणाचा डोक्यात कोयत्याने वार करून त्याचा खून करण्यात आला. या प्रकारामुळे अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी दिवसेंदिवस फोफावत चालल्याचे बोलले जात आहे.
गुन्हेगारीबरोबरच अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या अनेक महिन्यांपासून ऑनलाईन रोलेट जुगार सुरू असून, या खेळामध्ये अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. अनेकजण कर्जबाजारीदेखील झाल्याचे उघड झाले आहे. यासोबतच हाणामाऱ्या, घरफोड्या, चोऱ्यांसारखे गुन्हेही दररोज घडत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. एकूणच गेल्या काही महिन्यांपासून अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारीबरोबरच रोलेट या ऑनलाईन जुगार खेळामुळे अनेकांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले असून, या खेळाच्या मास्टर माईंडचा शोध घेऊन या खेळाचे संपूर्ण उच्चाटन करणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.
रोलेट खेळाच्या नाशिक जिल्ह्यातील मास्टर माईंडविरुध्द कठोर कारवाई करावी, यासाठी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची भेट घेऊन निवेदन देणार असल्याचे महात्मा फुले समता परिषदेचे शहराध्यक्ष संतोष सोनपसारे यांनी सांगितले.