अंबानींच्या सुनेची पैठणी, सात महिने राबले कारागीर; सोने-चांदीची जर वापरून ही पैठणी साकारली
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2024 11:17 AM2024-07-20T11:17:39+5:302024-07-20T11:17:58+5:30
दिव्यांगांचे शेकडो हात त्यासाठी अहोरात्र राबत होते. पारंपरिक व नवीन डिझाइनचा संगम करून सोने-चांदीची जर वापरून ही पैठणी साकारली आहे.
सुनील गायकवाड
येवला (जि. नाशिक) : मुकेश व नीता अंबानी यांच्या लेकाचा विवाह सोहळा आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजला. या सोहळ्यात वधूने नेसलेली पैठणी येवल्यात बनवली असून, यासाठी तब्बल सात महिने लागले. दिव्यांगांचे शेकडो हात त्यासाठी अहोरात्र राबत होते. पारंपरिक व नवीन डिझाइनचा संगम करून सोने-चांदीची जर वापरून ही पैठणी साकारली आहे.
सात-आठ महिन्यांपूर्वी मनीष मल्होत्रा आणि त्यांची डिझायनरची टीम येवल्यात आली. त्यांनी डिझाइन दाखवल्या. ती टीम व कापसे उद्योग समूहाच्या संचालिका गायत्री कापसे, सुनीता खोकले व कापसे यांची डिझायनर टीम यांनी कामाला सुरुवात केली. पैठणीवरील कलाकुसर जुन्या धाटणीची असल्याने वीणकाम करण्यासाठी त्या पद्धतीचे हातमाग तयार करून घ्यावे लागले. दिव्यांग, आदिवासी विणकरांनी हे काम लीलया पेलले.
शेकडो विणकरांना मिळाला रोजगार
अंबानी यांच्या ऑर्डर मिळाल्याने या भागामध्ये शेकडो दिव्यांगांना काम मिळाले आहे. विणकरांना आपले कसब पणाला लावून काम करताना अनेक नवीन गोष्टी शिकता आल्या, बारकावे हेरता आले. या विवाह सोहळ्यास गायत्री कापसे उपस्थित होत्या. वधू राधिका मर्चंट यांनी गायत्री यांची भेट घेऊन या महावस्त्राचे कौतुक केले.