अंबडला घरफोड्यांत तीन लाखांचा ऐवज लूटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2020 02:28 PM2020-02-01T14:28:54+5:302020-02-01T14:30:41+5:30
बंद घरांचे कुलूप तोडून चोरट्यांनी सुमारे १लाख ६९ हजारांचा ऐवज लूटून नेल्याची घटना शुक्रवारी (दि.३१) उघडकीस आली.
नाशिक : अंबड पोलीस ठाणे हद्दीत मागील काही दिवसांपासून गुन्हेगारीत वाढ झाली आहे. लागोपाठ झालेल्या घरफोड्यांच्या दोन घटनांमध्ये चोरट्यांनी सुमारे २ लाख ९० हजार रूपयांचा ऐवज लूटल्याचे उघडकीस आले आहे.
सिडको परिसरातील शिवपुरी चौकात राहणारे अनिल पंढरीनाथ साळुंके (३९) यांच्यासह वनाजी दगा सोनवणे यांच्या बंद घरांचे कुलूप तोडून चोरट्यांनी सुमारे १लाख ६९ हजारांचा ऐवज लूटून नेल्याची घटना शुक्रवारी (दि.३१) उघडकीस आली. साळुंके यांच्या बंद घरात अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून ८० हजाराची ३५ग्रॅमची सोन्याची पोत, २ हजाराचे चांदीचे गोफ, जोडवे, १५ हजारांची रोकड असा ऐवज लूटला. तसेच सोनवणे यांच्या घरातून २५ हजारांची सोन्याची ९ग्रॅमची अंगठी, १८ हजारांच्या सोन्याच्या तीन अंगठ्या, सहा ग्रॅमचे ओमचे दोन पान, २९ हजाराची रोकड असा सुमारे एकूण १ लाख ६९ हजारांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला. साळुंके व साक्षीदार सोनवणे यांच्या फिर्यादीवरून अंबड पोलिसांनी अज्ञात संशयितांविरूध्द जबरी घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.
दुसऱ्या घटनेत गंगापूररोडवरील सुरेश सदाशिवराव जोशी (६८) यांच्य कारखान्याचे उत्पादन दालनाच्या खिडकीचे गज वाकवून अज्ञात चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश कारत विविध माल उत्पादनासाठी लागणारे साहित्य लंपास केले. जोशी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचे १ लाख २१ हजाराचे साहित्य अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून लांबविल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.