आंबेगाव गोरखनगर : गावास पाण्यासाठी घोषणाबाजी व संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 01:40 AM2018-03-08T01:40:59+5:302018-03-08T01:40:59+5:30
येवला : ३८ गाव पाणीपुरवठा योजनेतून गोरखनगर गावासाठी पिण्याचे पाणी मिळत नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी येवल्यातील ३८ गाव पाणीपुरवठा योजनेच्या कार्यालयावर हंडा मोर्चा नेऊन कार्यालयासमोर उपोषण करून आपल्या मागण्यांसाठी घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला. या मागणीचे निवेदन ३८ गाव पाणीपुरवठा योजनेचे उपाध्यक्ष मोहन शेलार यांना ग्रामस्थाच्या वतीने देण्यात आले.
हंडा मोर्चात सहभागी गोरखनगर परिसरातील नागरिक.
येवला : ३८ गाव पाणीपुरवठा योजनेतून गोरखनगर गावासाठी पिण्याचे पाणी मिळत नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी येवल्यातील ३८ गाव पाणीपुरवठा योजनेच्या कार्यालयावर हंडा मोर्चा नेऊन कार्यालयासमोर उपोषण करून आपल्या मागण्यांसाठी घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला. या मागणीचे निवेदन ३८ गाव पाणीपुरवठा योजनेचे उपाध्यक्ष मोहन शेलार यांना ग्रामस्थाच्या वतीने देण्यात आले.
३८ गाव पाणीपुरवठा योजना प्रशासनाने गोरखनगर येथे पाणीपुरवठा करण्यासाठी २०१५ला नाहरकत प्रमाणपत्र दिले असल्याने अनकाई ग्रामपंचायत प्रशासनाचा भोंगळपणा समोर आला असून, यातून गोरखनगर ग्रामस्थ व ३८ गाव योजना प्रशासनाला नाहक मनस्ताप सहन करावा लागला.
अनकाई ग्रुप ग्रामपंचायत असून, यात गोरखनगरचा समावेश आहे. ७०० ते ८०० लोकसंख्या असलेले हे गाव पूर्वीपासूनच दुष्काळी गाव म्हणून ओळखले जाते. गावात महिलांना हंडाभर पाण्यासाठी भटकंती करावी लागते. येथून जवळच ३८ गाव पाणीपुरवठा योजनेची टाकी आहे. या टाकीतून गावाला पाणीपुरवठा होणे शक्य असल्याने पिण्यासाठी पाणी मिळावे, अशी मागणी अनेकदा ग्रामपंचायत प्रशासनाकडे केली. ग्रामपंचायत प्रशासनाने तसा प्रस्ताव ३८ गाव पाणीपुरवठा योजनेकडे दिला. २०१५ मध्ये इतर गावांसह गोरखनगरला पाणीपुरवठा करता येईल, असे पत्र प्रशासनाने ग्रामपंचायतीला दिले. २०१५ पासून ग्रामपंचायतीने या प्रश्नाकडे कानाडोळा केल्याने आज ग्रामस्थांना उपोषणाची वेळ आल्याचे निवेदनात म्हटले आहे.
गोरखनगर येथे दरवर्षी उन्हाळ्यात टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो; मात्र आता ३८ गाव पाणीपुरवठा योजनेतून पाणीपुरवठा करण्यात यावा, अन्यथा आम्हाला उपोषणाशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर निवृत्ती घुमरे, बाजीराव कोल्हे, पुष्पा मेमाणे, कमल घुमरे, कविता खैरनार, भीमाबाई खैरनार आदींसह अनेक नागरिकांच्या सह्या आहेत.१३ किंवा १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून ३८ गाव पाणीपुरवठा योजनेचे पाणी जोडून घेतले असते तर आज आमच्या गावातील लोकांवर भटकण्याची वेळ आली नसती.
- जगन बोराडे,
माजी सरपंच, ग्रामपंचायत अनकाई
ग्रामपंचायत प्रशासनाने मागणी केल्यानुसार ४ नोव्हेंबर २०१५ रोजी गोरखनगर येथे पाणीपुरवठा करण्यास परवानगी देण्यात आली असून, पाणीपुरवठा जोडून घेण्याची जबाबदारी ग्रामपंचायत प्रशासनाची आहे.
- मोहन शेलार,
उपाध्यक्ष, ३८ गाव पाणीपुरवठा योजना