आंबेकर यांचा ब्रह्मरत्न पुरस्काराने सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:12 AM2021-06-06T04:12:12+5:302021-06-06T04:12:12+5:30
नाशिक : पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश या पंच तत्त्वांपैकी तेजाचा आविष्कार घडविणारे अग्निहोत्र हे सूर्य शक्तीचे ...
नाशिक : पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश या पंच तत्त्वांपैकी तेजाचा आविष्कार घडविणारे अग्निहोत्र हे सूर्य शक्तीचे निसर्ग संवादी रूप असल्याचे प्रतिपादन अग्निहोत्री बाळकृष्ण आंबेकर यांनी केले. नाशिकमध्ये महर्षी गौतम गोदावरी वेदविद्या प्रतिष्ठानतर्फे ९४ वर्षीय वेदशास्त्रसंपन्न अग्निहोत्री बाळकृष्ण हरी आंबेकर यांचा ब्रह्मरत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
त्यानिमित्त सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. गेल्या ४३ वर्षांपासून अग्निहोत्राची, यज्ञ नारायणाची सेवा अविरतपणे करणाऱ्या आंबेकर यांना गोखले एज्युकेशन सोसायटीचे विभागीय सचिव बीवायके महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. राम कुलकर्णी व मुंबई विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य डाॅ. अस्मिता वैद्य यांच्या हस्ते २१ हजार रुपये रोख गुरूदक्षिणा, सन्मानचिन्ह, मानपत्र व महावस्त्र देऊन सन्मानित करण्यात आले. प्राचार्य वैद्य यांच्या हस्ते पुष्पावती आंबेकर यांचा साडी-चोळी देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी डाॅ. अद्वैत वैद्य, सतीश महाजन, आंबेकर यांचे पुत्र चिंतामणी, मुकुंद, विलास, हरिहर व नातू विक्रम तसेच सुनांसह संपूर्ण परिवार उपस्थित होता. चिंतामणी व मुकुंद आंबेकर यांनी अग्निहोत्राची माहिती सांगितली. भारतीय संस्कृतीची ही गौरवशाली परंपरा जपण्याचे आवाहन डाॅ. कुलकर्णी व डाॅ. वैद्य यांनी केले. यावेळी सतीश महाजन यांनी पाठशाळेला अकरा हजार रुपये देणगी जाहीर केली. प्रतिष्ठानचे सचिव तथा प्रधानाचार्य रवींद्र पैठणे यांनी प्रास्ताविक केले. विश्वास देवकर यांनी सूत्रसंचालन व मानपत्राचे वाचन केले. वेदान्त व अद्वैत पैठणे यांनी संयोजन साहाय्य केले. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील सार्वजनिक कार्यक्रम टाळून राज्यात बारा ठिकाणी अग्निहोत्री विद्वानांचा ब्रह्मरत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येत आहे. अन्य पुरस्कारार्थींमध्ये नागपूर येथील आहिताग्नी विनायक काळी, देऊळगाव राजा येथील माधव अग्निहोत्री, सातारा येथील गोविंदशास्त्री जोशी, नृसिंहवाडी येथील विजय मणेरीकर, राजापूर येथील अनिरुद्ध ठाकूर, पंढरपूर येथील भीमाचार्य वरखेडकर, बार्शीतील चैतन्य काळे, गंगाखेड येथील यज्ञेश्वर सेलूकर, तिरुपती येथील ओंकार सेलूकर तर पुण्यातील सुधाकर कुलकर्णी व शांताराम जोशी यांचा सन्मान करण्यात येणार आहे. प्रत्येकी ११ हजार रुपये रोख गुरूदक्षिणा, सन्मानचिन्ह, मानपत्र व महावस्त्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. हे पुरस्कार टप्प्याटप्प्याने प्रदान करण्यात येणार आहेत.
फोटोओळ (पीएचजेएन ८४)
महर्षी गौतम गोदावरी वेदविद्या प्रतिष्ठानतर्फे बाळकृष्ण हरी आंबेकर यांचा ब्रह्मरत्न पुरस्कार देऊन सन्मान करताना प्राचार्य डाॅ. राम कुलकर्णी. समवेत प्राचार्य डाॅ. अस्मिता वैद्य, पुष्पावती आंबेकर, रवींद्र पैठणे, विश्वास देवकर, सतीश महाजन, डाॅ. अद्वैत वैद्य आदी.