अंबिकानगरच्या तुंबलेल्या गटारी मोकळ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 04:11 PM2019-06-29T16:11:22+5:302019-06-29T16:12:06+5:30
ग्रामपंचायतीकडून दखल : ट्रॉलीभर कचरा काढला बाहेर
पिंपळगाव बसवंत : सांडपाण्याची योग्य विल्हेवाट होत नसल्याने प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे गेल्या कित्येक दिवसापासून अंबिकानगरचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी थेट जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात जात असल्याचे वृत्त लोकमतमध्ये झळकल्यानंतर खडबडून जागे झालेल्या ग्रामपंचायतीच्या आरोय विभागाने गटारीत तुंबलेला सुमारे एक ट्रॉलीभर कचरा बाहेर काढला.
अंबिका नगर परिसरात अनेक दिवसापासून गटारी तुंबलेल्या अवस्थेत होत्या. या गटारींची सफाई वेळोवेळी होत नव्हती. त्यामुळे गटारी तुंबल्या होत्या. परिणामी गटारी भरून वाहत सांडपाणी रस्त्यावर येत होते. सदर दुर्गंधीयुक्त पाणी जिल्हा परिषदेच्या शाळेच्या प्रांगणात येत होते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले होते. शाळेच्या प्रवेशद्वारावरच सांडपाणी येऊन साचत असल्याने विद्यार्थ्यांना तेथून मार्ग काढणे मुश्किल बनले होते. या समस्येकडे लोकमतने लक्ष वेधले. सदर वृत्त झळकल्यानंतर प्रशासनाने जागचे हलले आणि तातडीने ग्रामपंचायतीच्या आरोग्य विभागाने नियोजन करत पाण्याचा प्रेशर देऊन 3-4 तासाच्या परिश्रमाने एक ट्रॉली भरेल एवढा कचरा गटारीबाहेर काढला.
कचरा टाका घंटागाडीत
पावसाळ्यात दुर्गंधीच्या सांडपाण्यामुळे तयार होणाऱ्या डासांमुळे डेंगूसारख्या भयंकर आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगावी व टाकाऊ कचरा घंटागाडीतच टाकावा, असे आवाहन ग्रामपंचायतीच्यावतीने करण्यात आले आहे.