अंबिकानगरचे सांडपाणी जिल्हा परिषदेच्या शाळेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 04:10 PM2019-06-26T16:10:44+5:302019-06-26T16:11:15+5:30
पिंपळगाव बसवंत : विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका
पिंपळगाव बसवंत : सांडपाण्याची योग्य विल्हेवाट न लावल्याने प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे अंबिकानगरचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी थेट जिल्हा परिषदेच्या शाळेच्या प्रांगणात जात आहे. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना दुर्गंधीचा मोठा त्रास सहन करावा लागत असून त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
परिसरात अनेक दिवसापासून गटारी तुंबलेल्या अवस्थेत आहे. या गटारींची सफाई वेळोवेळी होत नाही. सफाई कामगार येतात पण बैठक मांडून गप्पा मारण्यातच त्याची सुट्टी होत असल्याची चर्चा नागरीक करतांना दिसतात. त्यामुळे कचऱ्यामुळे गटारी तुडुंब भरल्याने सांडपाणी गटारीच्या बाहेरून वाहत आहे. जवळच जिल्हा परिषद शाळा असल्याने परिसरातील दुर्गंधीचे पाणी शाळेच्या परिसरात जमा होत असल्याने शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी त्या पाण्यातून जावे लागत आहे. या सांडपाण्याने तयार होणाºया डासांमुळे डेंग्यू सारख्या आजाराला सामोरे जावे लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ग्रामपंचायतीने त्वरित येथील सांडपाण्याची समस्या सोडविण्याची मागणी होत आहे.
वेळीच स्वच्छता होणे गरजेचे
अंबिका नगर येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ग्रामपंचायतचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था झाली असून गटारी तुंबलेल्या असल्याने परिसरातील सांडपाणी शाळेच्या परिसरात जात आहे. त्यामुळे वेळीच स्वच्छता होणे गरजेचे आहे.
- संजय गवळी, रहिवासी, अंबिकानगर