पावसाचे वाहून जाणारे पाणी वळवण्यासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प लवकरच मार्गी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2020 08:28 PM2020-11-19T20:28:54+5:302020-11-19T20:29:24+5:30
दिंडोरी : दिंडोरी, पेठ, सुरगाणा तालुक्यात पावसाचे पाणी पश्चिमेकडे वाहून समुद्रात जात असून, ते पाणी अडवल्यास स्थानिक जनतेला त्याचा फायदा होऊन उर्वरित पाणी पूर्वेकडे वळवत ते गोदावरी खोऱ्यात आणण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावू, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले.
दिंडोरी : दिंडोरी, पेठ, सुरगाणा तालुक्यात पावसाचे पाणी पश्चिमेकडे वाहून समुद्रात जात असून, ते पाणी अडवल्यास स्थानिक जनतेला त्याचा फायदा होऊन उर्वरित पाणी पूर्वेकडे वळवत ते गोदावरी खोऱ्यात आणण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावू, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले. दिंडोरी तालुक्यातील देवसाने (मांजरपाडा) प्रकल्प बारा वळण योजना यांची पाहणी तसेच देहरे येथे ल.पा. योजनेच्या कामाचा शुभारंभ, अंबाड येथील ल.पा. योजनेचे जलपूजन जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. देहरे येथील ल. पा. योेजनेबाबत जिल्हा परिषद सदस्य अशोक टोंगारे यांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे पाठपुरावा केला होता. यावेळी जयंत पाटील यांनी धोंडाळपाडा ग्रामस्थांशी संवाद साधला.
जयंत पाटील यांनी दिंडोेरी, पेठ तालुक्यात देवसाने मांजरपाडासह विविध वळण योजना लघुपाटबंधारे आदी सिंंचन प्रकल्प राबवल्याबद्दल कौतुक करत हा प्रकल्प लवकरच पूर्ण करू, आवश्यक त्या नवीन योजनांचा सर्व्हे करत त्या योजनाही मार्गी लावू, असे आश्वासन जयंंत पाटील यांनी दिले. दिंडोरी, पेठ, सुरगाणा तालुक्यातील पश्चिम घाटमाथ्यावर अनेक ठिकाणी भरपूर पाऊस पडतो. पावसाचे मोजमाप करण्यासाठी मोठ्या संख्येने पर्जन्यमापक यंत्रे बसवण्यात येतील. पश्चिमेला वाहून जाणारे पावसाचे पाणी समुद्राला जाऊन मिळते. त्यासाठीच वळण योजनांचा वापर पाणी अडवण्यासाठी करता येईल. या पाण्याचे आदिवासी दुर्गम भागातील शेतकऱ्यांना फायदा होणार असून उर्वरित पाणी गोदावरी खोऱ्यात येणार असल्याने उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्याला त्याचा फायदा होणार आहे. या परिसरातील वळण योजनांच्या रखडलेल्या कामाला गती देण्यात येईल. ग्रामस्थांच्या मागणीवरून छोटे छोटे केटिवेअर, पाझर तलाव बांधून स्थानिक ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याला कटिबद्ध आहे, असेही पाटील म्हणाले.
वळण योजनांसाठी स्थानिकांनी जमिनी दिल्या, परंतु स्थानिकांना पाणी आरक्षण मिळत नाही. अनेक ठिकाणी पाणीवापर संस्था स्थापन केल्या आहेत; परंतु त्यांना प्रमाणपत्र मिळालेले नाही. मांजरपाडा प्रकल्पातही स्थानिक जनतेला पाणी आरक्षण मिळालेले नाही, ते देण्यात यावे आदी मागण्या विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी केल्या. यावेळी कादवा चेअरमन श्रीराम शेटे यांनीही तालुक्यातील सिंचन समस्या पाटील यांच्याकडे मांडल्या.