आंबेवणी ग्रामसभेत दारूविक्री बंदीसाठी एकमुखी ठराव
By admin | Published: December 23, 2014 10:15 PM2014-12-23T22:15:21+5:302014-12-23T22:15:36+5:30
निर्णय : तक्रारीच्या प्रती अधिकाऱ्यांना सादर
वणी : आंबेवणी परिसरातील बेकायदा दारूविक्री बंद करण्यासाठी माहितीवर्ग व ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारींची दखल घेत आंबेवणी
ग्रुप ग्रामपंचायतने ग्रामसभेत ठराव करून सदर ठरावाच्या व तक्रारीच्या प्रती विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांना देऊन कारवाईची मागणी केली आहे.
आंबेवणी ग्रुप ग्रामपंचायतमध्ये करंजई व घोडेवाडी गावाचा समावेश असून, सुमारे पाच हजार इतकी लोकसंख्या आहे. आंबेवणी परिसरात गेल्या काही कालावधीपासून सुरू असणाऱ्या बोकायदा दारूविक्रीमुळे तरुण व्यसनाधीन झाले असून अनेकांचे संसार यामुळे उद्ध्वस्त झाले आहेत.
तसेच कुटुंबातील सदस्य महिलांना प्रसंगी मारहाण करून कौटुंबिक वातावरणात तणाव निर्माण होत असल्याने सदर बेकायदा दारूविक्री त्वरित कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
असे व्यवसाय करणाऱ्या घटकांवर कडक कारवाईची मागणी करून सामाजिक स्वास्थ अबाधित राखण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबतच्या प्रती पोलीस निरीक्षक जिल्हाधिकारी, तहसीलदार, उत्पादनशुल्क विभागाला देण्यात आल्या आहेत. (वार्ताहर)