रुग्णवाहिकेलाही पार करावी लागते अडथळ्यांची शर्यत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:14 AM2021-01-21T04:14:47+5:302021-01-21T04:14:47+5:30

नाशिक : वेळ पाच वाजेची... जिल्हा शासकीय रुग्णालयातून एका नवजात शिशुला ‘१०८’ रुग्णवाहिकेत आणले गेले... अवघ्या पाचशे ग्रॅम वजनाच्या ...

The ambulance also has to cross the obstacle race | रुग्णवाहिकेलाही पार करावी लागते अडथळ्यांची शर्यत

रुग्णवाहिकेलाही पार करावी लागते अडथळ्यांची शर्यत

Next

नाशिक : वेळ पाच वाजेची... जिल्हा शासकीय रुग्णालयातून एका नवजात शिशुला ‘१०८’ रुग्णवाहिकेत आणले गेले... अवघ्या पाचशे ग्रॅम वजनाच्या या तान्हुल्याला डॉक्टरांनी ऑक्सिजन लावले अन‌् पाच वाजून तीन मिनिटाला रुग्णवाहिकेने रुग्णालयाचा उंबरा ओलांडला... शहराच्या मध्यवर्ती भागातून प्रवास करत निमाणी येथील एका खासगी रुग्णालयात रुग्णवाहिकेला पोहोचण्यासाठी ठिकठिकाणी अडथळ्यांची शर्यत पार करावी लागल्याचे चित्र ‘याचि देही याचि डोळा’ पाहावयास मिळाले.

दिंडोरीसारख्या ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रात जन्मलेल्या बाळाचे वजन कमी असल्याने त्यास उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे बाळाची प्रकृती स्थिर झाल्यानंतर शासनाच्या महात्मा फुले जीवनदायीनी योजनेअंतर्गत पुढील उपचारासाठी पालकांच्या इच्छेनुसार पंचवटीतील निमाणीजवळील एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. रुग्णालयातून निघालेली आपत्कालीन मोफत वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्या शासनाच्या ‘१०८’ रुग्णवाहिकेला जिल्हा शासकीय रुग्णालय ते निमाणी हे साधारणत: पाच किलोमीटरचे अंतर कापताना अक्षरक्ष: तारेवरची कसरत करत मार्गक्रमण करावे लागले. रुग्णवाहिका चालक भरत खांडेकर यांनी वाहतूक कोंडी फोडत रुग्णवाहिकेला अवघ्या आठ मिनिटांत रुग्णालयापर्यंत पोहोचविले. सीबीएस सिग्नल, मेहेर सिग्नल, रविवार कारंजा, मालेगाव स्टॅन्ड, पंचवटी कारंजा या भागात रुग्णवाहिकेला मुजोरगिरी करणारे रिक्षाचालक, बेशिस्त दुचाकीचालक अन‌् बसचालकांच्या अडथळ्यांवर मात करावी लागली.

---इन्फो-

रुग्णवाहिकेचा ठिकठिकाणी खोळंबा

शहराच्या मध्यवर्ती भागातून अवघे पाच किलोमीटरचे अंतर कापताना रुग्णवाहिकेला ठिकठिकाणी खोळंबावे लागले. अर्ध्या मिनिटांत त्र्यंबकनाक्याच्या सिग्नलवर रुग्णवाहिका आली; मात्र तेथून डावीकडे वळण घेत सीबीएसच्या दिशेने रुग्णवाहिका जात असताना एसबीआय बँकेसमोर दुभाजकाच्या पंक्चरमधून एका महिला कारचालकाने ‘यु-टर्न’ घेत वाट अडविली. परिणामी एसबीएसच्या सिग्नलवर ‘लाल’ दिवा लागला अन‌् रुग्णवाहिकेपुढे वाहने थांबल्याने नाईलाजास्तव रुग्णवाहिका थबकली. पंचवटी कारंजा येथे रुग्णवाहिकेची वाट बसचालकाने रोखली. तत्पूर्वी मालेगाव स्टॅन्ड, शनि गल्ली येथे रिक्षाचालकांनी रुग्णवाहिकेला जागा न देता मुजोरगिरी दाखविली.

---इन्फो---

सीबीएसवर पोलीस ‘बघे’; मेहेरवर धावले मदतीला

सीबीएस येथे सिग्नल लागल्यामुळे पुढे वाहने थांबून राहिल्याने रुग्णवाहिका अडकून पडली. डावे वळणही ‘स्मार्ट’ कारभारामुळे बंद असल्याने रुग्णवाहिका चालकाला तेथूनही मार्ग बंद होता. त्यामुळे अपरिहार्यता म्हणून सिग्नल ‘ग्रीन’ होण्याची प्रतीक्षा करावी लागली. यावेळी सीबीएस बसस्थानकाच्या भिंतीजवळ गप्पांमध्ये रंगलेले वाहतूक पोलीस रुग्णवाहिकेचा सायरन ऐकूनही मदतीला धावून आले नाहीत. याउलट चित्र मेहेर चौकात बघावयास मिळाले. येथे रुग्णवाहिका अडकून पडल्यानंतर वाहतूक पोलीस धावून आले आणि सिग्नल लाल असतानही त्यांनी काही वाहने पुढे काढून देत रुग्णवाहिकेला वाट मोकळी करून दिली.

---कोट--

या मार्गावर वाहनचालकांनी रस्ता मोकळा करून दिला असता तर हे अंतर केवळ पाच मिनिटांतच पार झाले असते. आम्हाला दररोजच असा अनुभव येतो. अत्यंत इमर्जन्सी केसमध्ये तर रुग्णवाहिकेचा वेग आणि नियंत्रण यांचे समीकरण जुळवून सुरक्षितपणे रुग्णालयात रुग्णाला पोहोचविताना कसोटी लागते. रस्त्यांवरील खड्डे ही गंभीर समस्या आहे. द्वारका ते आडगावपर्यंत महामार्गावर गतिरोधकांचा वारंवार अडथळा येतो.

- भरत खांडेकर, रुग्णवाहिका चालक

---

डमी आहे-

डमी जेपीजी २०रोड सेफ्टी नावाने आर वर

फोटो आर वर २०हॉस्पिटल, २०डिस्ट्न्स, २०स्कॅनिंग, २०टाईम नावाने.

-

Web Title: The ambulance also has to cross the obstacle race

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.