रुग्णवाहिकेतच महिलेची प्रसुती, जुळ्यांना दिला जन्म
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 06:33 PM2018-09-10T18:33:34+5:302018-09-10T18:34:01+5:30
कळवण तालुक्यातील आदिवासी अतिदुर्गम भागातील घटना
कळवण : कळवण तालुक्यातील आदिवासी दुर्गम भागातील तिळगव्हाण येथील मीरा सुरेश गवळी या महिलेची रु ग्णवाहिकेतच सुखरूप प्रसूती करण्यात डॉ सचिन पगार व आरोग्यसेविका एस के गायकवाड यांना यश आल्याने अनर्थ टळला. दरम्यान, सदर महिलेने जुळ्यांना जन्म दिला आहे. या घटनेने अतिदुर्गम भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र तत्काळ सुरु करणे किती गरजेचे आहे ह्याची जाणीवच जिल्हा आरोग्य यंत्रणेला करुन दिलेली आहे.
तालुक्यातील जयदर प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत असलेल्या मौजे काठरा येथील उपकेंद्रात ७ आॅगस्ट रोजी मानविकास शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबारात तपासणी करण्यासाठी तिळगव्हाण येथील गरोदर आदिवासी महिला मीरा सुरेश गवळी हिस नेण्यासाठी आरोग्यसेविका एस.के. गायकवाड या गेल्या होत्या. मात्र, सदर गरोदर मातेस घरीच प्रसूती कळा सुरु झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. महिलेला आरोग्य केंद्रापर्यंत नेण्यास स्थानिक ठिकाणी कोणतेही वाहन उपलब्ध नसल्याने प्रसंगावधान राखून आरोग्यसेविका गायकवाड यांनी भ्रमणध्वनीवरून वैद्यकीय अधिकारी डॉ किशोर देशमुख यांच्याशी संपर्क साधला. डॉ देशमुख यांनी तत्काळ डॉ सचिन पगार व वैद्यकीय पथकासह रु ग्णवाहिका दहा मिनिटात घटनास्थळी रवाना केली. प्रसूती कळा सुरु असलेल्या महिलेची परिस्थिती पाहून डॉ. पगार व आरोग्यसेविका गायकवाड यांनी रु ग्णवाहिकेतच सुखरूप प्रसूती घडवून आणली. प्रसूती झाल्यानंतर जुळे बाळ असल्याचे आणि दुसरे बाळ पोटातच आडवे झाल्याचे पगार यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ सदर महिलेस रु ग्णवाहिकेतून प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. त्याठिकाणी मानविकास शिबिरासाठी नाशिक येथून आलेले स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. किशोर गायकवाड व बालरोग तज्ज्ञ डॉ. अमित आव्हाड यांनी मातेची तपासणी केली आणि दुसरी प्रसुतीही सुखरूप झाली. दोन्ही बाळांचे वजन कमी असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी उपजिल्हा रु ग्णालय येथे पाठविण्यात आले आहे.