रुग्णवाहिका चालक पसार, मातेने गमावले बाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:18 AM2021-06-09T04:18:44+5:302021-06-09T04:18:44+5:30
बागलाण तालुक्याचा पश्चिम आदिवासी भाग आजही आरोग्याच्या बाबतीत दुर्लक्षित असल्याचे दिसून येत आहे . गेल्या बुधवारी साल्हेरच्या भिकारसोंडा पाड्यावरील ...
बागलाण तालुक्याचा पश्चिम आदिवासी भाग आजही आरोग्याच्या बाबतीत दुर्लक्षित असल्याचे दिसून येत आहे . गेल्या बुधवारी साल्हेरच्या भिकारसोंडा पाड्यावरील पंचवीस वर्षीय गर्भवती महिला संगीता यांना घरीच प्रसूती कळा येत होत्या. प्रकृती बिघडल्याने दुपारी साडे बारावाजेच्या दरम्यान संगीताचे काका दगा रामा भोये यांनी तत्काळ नजीकच्या साल्हेर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल पाठक यांनी प्राथमिक उपचार करून बाळ पोटात आडवे झाल्याने त्यांना पुढील उपचारसाठी तातडीने कळवण उपजिल्हा रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. त्यासाठी डॉ. पाठक यांनी आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका सज्ज करण्याच्या सूचनाही दिल्या. रुग्णवाहिका चालक गजानन भोये तेथून पसार झाल्याचे आढळून आले. दोन तास त्याची शोधाशोधदेखील करण्यात आली मात्र तो आढळून आला नाही. त्यानंतर गावातील खासगी वाहनचालकाला शोधून रुग्णवाहिका नेण्याचा निर्णय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घेतला. वाहनचालकही मिळाला परंतु रुग्णवाहिका चालक चावी घेऊन पसार झाल्याचे उघडकीस आले. या दरम्यान वेळेवर उपचार मिळत नसल्याने महिलेली प्रकृती अधिकच बिघडली. सायंकाळी एका खासगी वाहनाला पाचारण करून कळवण येथील उपजिल्हा रुग्णालयात तिला दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शस्त्रक्रिया करून प्रसूती केली मात्र दुर्दैवाने वेळीच उपचार न मिळाल्याने बाळ मरण पावल्याचे घोषित करण्यात आले.
कोट...
सदर प्रकार गंभीर असून या घटनेची तत्काळ चौकशी करण्यात येईल. चौकशीदरम्यान अधिकारी, कर्मचारी, रुग्णवाहिका चालक दोषी आढळल्यास त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करून तसा अहवाल जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येईल .
- डॉ. हेमंत अहिरराव, तालुका वैद्यकीय अधिकारी, बागलाण
कोट...
आरोग्य यंत्रणा अक्षरशः वाऱ्यावर आहे. वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, रुग्णवाहिका चालक मुख्यालयात राहत नाहीत. त्यामुळे असे दुर्दैवी प्रकार घडत आहेत. घडलेला प्रकार अत्यंत संतापजनक आहे. संबंधित दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करून न्याय द्यावा.
- राणी मधुकर भोये, सरपंच, साल्हेर