मुसळगाव ग्रामपंचायतीकडून रुग्णवाहिकेची सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2020 11:21 PM2020-01-09T23:21:17+5:302020-01-09T23:22:13+5:30
मुसळगाव ग्रामपंचायतीने चौदाव्या वित्त आयोगातून नागरिकांसाठी रुग्णवाहिका सेवा उपलब्ध केली आहे. नागरिकांना रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध झाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा आमदार माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते पार पडला.
मुसळगाव : येथील ग्रामपंचायतीने चौदाव्या वित्त आयोगातून नागरिकांसाठी रुग्णवाहिका सेवा उपलब्ध केली आहे. नागरिकांना रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध झाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा आमदार माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते पार पडला.
ग्रामस्थांच्या सुविधेसाठी मुसळगाव ग्रामसभेत रुग्णवाहिका खरेदी करण्याचा ठराव ग्रामपंचायतीने मांडला आला होता. सदर प्रस्ताव २०१९-२० च्या पंचवार्षिक कृती आराखडात समाविष्ट करण्यात आला. पंचवार्षिक कृती आराखड्यातील कामांपैकी रुग्णवाहिका घेण्याचा एक प्रस्ताव होता. सामाजिक काम म्हणून रुग्णवाहिका घेण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. तालुक्यातून व परिसरातून अनेक कामगारांची नेहमीच या परिसरात वर्दळ असते. अनेक आजारी लहान मुले, महिला, आबालवृद्ध यांना तातडीने रुग्णसेवा मिळावी या हेतूने मुसळगाव ग्रामपंचायतीने नागरिकांप्रति सेवाभाव जपत रुग्णवाहिका घेण्याचा मानस प्रत्यक्षात उतरविला. यासाठी ग्रामपंचायतीच्या चौदाव्या वित्त आयोगातून निधी खर्ची घालत रुग्णवाहिका खरेदी केली आहे. ना नफा ना तोटा या धर्तीवर सदर रुग्णवाहिका उपलब्ध असणार आहे. यावेळी सरपंच कमल जाधव, उपसरपंच रवींद्र शिंदे , सदस्य शिवाजी सिरसाट, गोविंद माळी, दत्तू ठोक, अर्चना माळी, अनिता जोंधळे, बेबी लहांगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते संतोष कदम, प्रकाश बाविस्कर, के. एस. कांबळे, नारायण नवले, गणपत माळी, गोविंद माळी, नंदू माळी, योगेश शिरसाट उपस्थित होते. मुसळगाव ग्रुप ग्रामपंचायतीची लोकसंख्या जास्त आहे. गावाच्या दोन्ही बाजूस सिन्नर-शिर्डी व सिन्नर-संगमनेर हे दोन महामार्ग आहेत. रात्री-अपरात्री अपघात नेहमीचीच बाब झाली आहे. गावालगतच औद्योगिक सहकारी वसाहत आहे. कारखान्यातही छोटे-मोठे अपघात होत असतात. रुग्णांना वेळेत दवाखान्यात दाखल करता येईल अशी व्यवस्था उपलब्ध झाली आहे.