संघर्ष संस्थेची रुग्णवाहिका, वैकुंठरथाचे लोकार्पण
By admin | Published: December 21, 2016 11:03 PM2016-12-21T23:03:58+5:302016-12-21T23:04:14+5:30
संघर्ष संस्थेची रुग्णवाहिका, वैकुंठरथाचे लोकार्पण
इंदिरानगर : भाजपाप्रणित संघर्ष सेवाभावी संस्थेच्या वतीने गणेशोत्सवाच्या खर्चात बचत करून घेण्यात आलेल्या रुग्णवाहिका आणि वैकुंठरथाचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते राजे छत्रपती चौक, कलानगर येथे करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, वसंत गिते, अपूर्व हिरे, नगरसेवक सतीश कुलकर्णी, नगरसेवक सतीश सोनवणे, डॉ. दीपाली कुलकर्णी, गोपाळ पाटील, जगन पाटील उपस्थित होते. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आकाश खोडे म्हणाले की, मंडळाचे गणेशोत्सवातील सार्वजनिक उत्सवासाठी खर्च अधिक असतो. यामध्ये गणेशमूर्ती खरेदी, मिरवणूक, ढोल-ताशे, दहा दिवस सांस्कृतिक महोत्सव यासाठी खर्च येतो. भाजपाप्रणित संघर्ष सेवाभावी संस्थादेखील अशा प्रकारे स्थानिक नागरिकांच्या मदतीने खर्च करून उत्सव साजरा करते. परंतु गतवर्षी काही वेगळे करण्याचा संस्थेचा मनोदय होता. त्यामुळे संस्थेने गणेशोत्सवाच्या खर्चात बचत केली. परिसरातील नागरिकांना गरजेची अशी व्यवस्था करून देण्यासाठी संस्थेने पुढाकार घेतला. स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार रुग्णवाहिका आणि वैकुंठरथ तयार करण्यात आला. (वार्ताहर)