ओसाड माळरानावर अमेरिकन गोड मक्याची शेती
By Admin | Published: July 21, 2016 11:25 PM2016-07-21T23:25:34+5:302016-07-21T23:29:28+5:30
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर : निनावी येथील शेतकऱ्याच्या मेहनतीला फळ
लक्ष्मण सोनवणे बेलगाव कुऱ्हे
शेती व्यवसायात शेतकऱ्यांना मोठ्या आव्हानांना सामोरे जाण्याची वेळ येत असल्यामुळे शेतीकडे पाठ फिरवणारे काही शेतकरी कसेबसे जीवन कंठीत बसतात; मात्र कृषिक्षेत्रातील तंत्रज्ञानाला प्रचंड मेहनतीची जोड देत काही महत्त्वाकांक्षी शेतकरी नवेनवे प्रयोगांच्या शोधात ओसाड माळरानावर देखील यशस्वी शेती करून दाखवितात याचे उत्तम उदाहरण म्हणजे इगतपुरी तालुक्यातील आदिवासी दुर्गम भागातील निनावी येथील शेतकरी शंकर नामदेव टोचे यांनी तयार केलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करीत अमेरिकन गोड मक्याची यशस्वी केलेल्या शेतीचे.
इगतपुरी तालुक्यात हा पहिलाच प्रयोग असल्याने त्यांचे कौतुक केले जात आहे. त्यांनी शेतीमध्ये फुलवलेला अमेरिकन गोड मका बाजारात दाखल झाला असून, उत्पन्नदेखील चांगले मिळत आहे. साकूर फाटा येथील बालाजी अँग्रोच्या मार्गदर्शनामुळे नेत्रा सिड्सचे अमेरिकन स्वीटकॉर्न या गोड मक्याचे बियाणे घेऊन त्यांनी ओसाड माळरानावर सरी पाडून लागवड केली आहे. विविध प्रकारची रासायनिक खते व पोटॅश खतांचा मारा करून साधारण ७५ दिवसांच्या प्रयत्नातून कणीस तयार झाले झाले.
हे दाणेदार कणीस आता मुंबईसारख्या ठिकाणी विक्रीसाठी जात आहे. अमेरिकन स्वीटकॉर्न ही खाण्यास अत्यंत गोड असून, तिचे फळेदेखील जास्त वजनदार आहेत. त्यांना किरण मांडे व अतुल गोसावी यांच्या मार्गदर्शनातून हा यशस्वी प्रयोग उभा केला आहे.