राज यांच्या जोडीला आता अमितही राजकारणाची तयारी : कल्याण-डोंबिवलीबरोबरच नाशिकची जबाबदारी
By admin | Published: December 14, 2014 01:55 AM2014-12-14T01:55:47+5:302014-12-14T01:56:23+5:30
राज यांच्या जोडीला आता अमितही राजकारणाची तयारी : कल्याण-डोंबिवलीबरोबरच नाशिकची जबाबदारी
नाशिक- मनसेच्या पाठशाळेत सध्या एक राजपुत्र राजकारणाची बाराखडी गिरवत असून राज यांच्या साथीला आता ते ही मैदानात उतरले आहेत. अमित ठाकरे यांच्यावर कल्याण डोंबिवलीसह नाशिकची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे आता लवकरच अमित ठाकरे हेही राजकारणात सक्रिय होणार आहे. अमित हे आतापर्यंत मनसेच्या प्रचारात रोड शोच्या माध्यमातून भाग घेत असत. मात्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ते राज ठाकरे यांच्या प्रत्येक दौऱ्यात सहभागी होत आहेत. त्यातही कल्याण-डोंबिवली व नाशिकमध्ये ते आवर्जुन हजेरी लावत असून, कार्यकर्त्यांशी चर्चा करणे तसेच फारसे न बोलता कामांचे निरीक्षण करताना आढळतात. नाशिक दौऱ्यावर आलेल्या अमित ठाकरे यांच्याशी अनौपचारिक चर्चा केली असता, त्यांनी राजकारणात यायचे की नाही याबाबतचा संपूर्ण निर्णय राज ठाकरे घेणार असल्याचे सांगितले. मी फक्त राजकारणाचा अनुभव घेत आहे. सध्या मी कार्यकर्त्यांच्या संघटनावर भर दिला असून, त्यांच्या अडचणी सोडविण्याच्यादृष्टीने प्रयत्न करीत आहे. यासाठी कार्यकर्त्यांना माझा वैयक्तिक मोबाइल नंबर व ई-मेल आयडी दिला आहे. राज ठाकरे यांना प्रत्येक कार्यकर्त्यांशी बोलणे शक्य होत नाही. अशावेळी मी त्या कार्यकर्त्यांशी चर्चा करीत असतो. मला कल्याण-डोंबिवली या शहरांबरोबरच नाशिकदेखील आवडते. या शहराचा विकास करण्यासाठी राजसाहेब सर्वोत्तपरी प्रयत्न करीत असून, आपण काय योगदान देऊ शकतो, यादृष्टीने देखील मी विचार करीत आहे. भविष्यात राज यांनी या शहरांची जबाबदारी दिल्यास ती पेलण्याकरिता माझी तयारी सुरू असल्याचेही अमित यांनी सांगितले. राज यांनी नाशिकमध्ये आणि अन्यत्रही अमित ठाकरेयांचे नेतृत्व कार्यकर्त्यांवर लादणार नाही असे सांगितले आहे.