अमित ठाकरे यांच्याकडे नाशिकची जबाबदारी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:11 AM2021-07-18T04:11:48+5:302021-07-18T04:11:48+5:30

नाशिकमध्ये येणाऱ्या काळात महापालिकेसह जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे विविध राजकीय पक्षांनी निवडणुकांच्या दृष्टीने रणनीती ...

Amit Thackeray's responsibility for Nashik? | अमित ठाकरे यांच्याकडे नाशिकची जबाबदारी?

अमित ठाकरे यांच्याकडे नाशिकची जबाबदारी?

Next

नाशिकमध्ये येणाऱ्या काळात महापालिकेसह जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे विविध राजकीय पक्षांनी निवडणुकांच्या दृष्टीने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. त्याच दृष्टीने रणनीती निश्चित करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेेचे अध्यक्ष राज ठाकरे शुक्रवारी तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी नाशिकमध्ये दाखल झाले असून त्यांनी शनिवारी सकाळी पक्षाचे नेते डॉ. प्रदीप पवार, माजी महापौर, अशोक मुर्तडक, रतनकुमार इचम, जिल्हाध्यक्ष दिलीप दातीर, आनंता सूर्यवंशी, नगरसवेक सलीम शेख, शहाध्यक्ष अंकुश पवार, यांच्यासह पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेऊन शहर व जिल्ह्यातील परिस्थिती जाणून घेतली. तसेच डॉ. अतुल वडगावकर यांनीही राज ठाकरे यांंची भेट घेतली. याचवेळी अमित ठाकरे यांचेही शासकीय विश्रामगृह येथे आगमन होताच मनसैनिकांनी जोरदार स्वागत केले. मात्र अमित ठाकरे काही वेळातच पक्षाच्या शहरातील मध्यवर्ती कार्यालय राजगडच्या दिशेने रवाना झाले, त्यांनी या ठिकाणी शहरातील उपशहराध्यक्ष, शहरचिटणीस, विभागप्रमुख व गटप्रमुखांशी वन टू वन संवाद साधत महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरातील परिस्थिती जाणून घेत इच्छुकांचीही चाचपणी केली. त्यामुळे आगामी नाशिक महानगरपालिका निवडणुकांची सूत्र अमित ठाकरे यांच्यावर सोपविण्यात आली असल्याची शक्यता उपस्थितांमध्ये व्यक्त करण्यात आली. या ठिकाणी त्यांच्यासोबत मनसेचे नेेते संदीप देशपांडे, आमदार राजू पाटील यांच्यासह स्थानिक मनसेचे पदाधिकारी श्याम गोहाड, बंटी कोरडे, कौशल पाटील, मनोज घोडके आदी उपस्थित होते. दरम्यान, अन्य पक्षातून अनेक पदाधिकारी मनसेत प्रवेश करणार असल्याचा दावा स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत असला तरी शनिवारी विश्रामगृहात राज ठाकरे यांची अन्य पक्षातील कोणत्याही महत्त्वाच्या नेत्याने भेट घेतली नाही. त्यामुळे राज ठाकरे यांच्या पुढील दौऱ्यात पक्षप्रवेश होणार असल्याचे मनसे पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

इन्फो-

मनविसेचे अध्यक्षपद अमित ठाकरे यांच्याकडे?

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना अध्यक्ष आणि मनसे सरचिटणीस आदित्य शिरोडकर यांनी मनसेला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे त्यांच्या जागेवर कोणाची वर्णी लागणार, याविषयी मनसैनिकांमध्ये चर्चा सुरू आहे. मात्र अमित ठाकरे यांच्याविषयी तरुणाईमध्ये असलेली क्रेझ लक्षात घेऊन मनविसेचे अध्यक्षपदी अमित ठाकरे यांच्याकडेच सोपविले जाण्याची शक्यता असल्याची माहीती सूत्रांनी दिली आहे.

170721\17nsk_23_17072021_13.jpg~170721\17nsk_24_17072021_13.jpg

नाशिक दौऱ्यावर असलेले राज ठाकरे विश्रामगृहातून बाहेर पडताना ~नाशिक दौऱ्यावर असलेले राज ठाकरे विश्रामगृहातून बाहेर पडताना 

Web Title: Amit Thackeray's responsibility for Nashik?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.