ॲम्फोटेरेसिन इंजेक्शन लागतात दिवसाला ८; मात्र मिळते अवघे १
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:14 AM2021-05-23T04:14:45+5:302021-05-23T04:14:45+5:30
नाशिक : कोरोनाबाधितांवरील उपचारानंतर मधुमेही रुग्णांना होत असलेल्या म्युकरमायकोसिस आजारावर प्रभावी ठरणारे ॲम्फोटेरेसिन इंजेक्शन रुग्णांना दिवसाला किमान ८ ...
नाशिक : कोरोनाबाधितांवरील उपचारानंतर मधुमेही रुग्णांना होत असलेल्या म्युकरमायकोसिस आजारावर प्रभावी ठरणारे ॲम्फोटेरेसिन इंजेक्शन रुग्णांना दिवसाला किमान ८ ते १० लागतात. हे इंजेक्शन शुक्रवारपाठोपाठ शनिवारीदेखील प्रत्येक रुग्णाच्या नावे अवघे १ देण्यात आल्याने ही रुग्णांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची क्रूर चेष्टाच असल्याची संतप्त भावना म्युकरमायकोसिसग्रस्तांच्या कुटुंबीयांकडून व्यक्त हाेत आहे.
जिल्ह्यात शुक्रवारपर्यंत २४० रुग्णांची अधिकृत नोंद झालेली होती. त्यात शनिवारी अजून १४ रुग्णांची भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या शनिवारी २५४ पर्यंत पोहोचली आहे. मालेगाव आणि नाशिक शहरातच सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही रुग्ण असण्याची शक्यता असली तरी ग्रामीण भागात अधिक प्रमाणात नाक, कान, घसातज्ज्ञ किंवा दंतरोगतज्ज्ञ नसल्याने ग्रामीण भागात फारशी प्रकरणे उघडकीस आलेली नाहीत. ग्रामीण भागातील बहुतांश रुग्णदेखील नाशिक मनपा क्षेत्रातील रुग्णालयांमध्येच भरती झाले आहेत. त्यामुळे एकीकडे रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असताना शासनाकडून जिल्ह्याला मिळणाऱ्या इंजेक्शनच्या संख्येत मात्र त्या प्रमाणात वाढ झाली नसल्याने वाटप करणारी यंत्रणादेखील हतबल ठरली आहे. मात्र, ही संख्या वाढण्याचा दर आटोक्यात यावा, हीच अपेक्षा असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
इन्फो
दोन्ही दिवस केवळ १ इंजेक्शन
जिल्ह्याला शुक्रवारी प्राप्त झालेले २४० आणि २३४, असे इंजेक्शन्स प्राप्त झाले होते. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने प्रत्येक रुग्णाच्या नावे प्रत्येकी केवळ १ इंजेक्शन देण्यात आले. त्यामुळे दोन दिवसांचे इंजेक्शन मिळूनदेखील एका दिवसाला लागणारे इंजेक्शन्स झाले नसल्याने म्युकरमायकोसिसग्रस्त नागरिकांचे कुटुंबीय अक्षरश: हतबल झाले आहेत. इंजेक्शन्स बाजारातही उपलब्ध नसल्याने आणि शासनाकडूनही उपलब्ध होत नसल्याने काय करायचे, असा बिकट सवाल त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे.
कोट
गत आठवड्यात मोठ्या प्रमाणात मधुमेही रुग्णांना म्युकरमायकोसिस झाल्याचे दिसून येत आहे. मात्र, शासनाकडून मिळणारे इंजेक्शन्स कुणाला ४ द्यायचे किंवा कुणाला द्यायचेच नाही, यापेक्षा निर्देशानुसार प्रत्येकी किमान १ याप्रमाणे इंजेक्शन्स देत आहोत. शासनाकडून इंजेक्शन्सचे प्रमाण वाढल्यास रुग्णांना दिल्या जाणाऱ्या इंजेक्शनच्या प्रमाणात वाढ करणे शक्य होईल.
-डॉ. बापूसाहेब नागरगोजे, मनपा वैद्यकीय अधिकारी
कोट
कालपासून मिळत असलेले एकेक इंजेक्शन हा प्रकार खूप दुर्दैवी आहे. इंजेक्शन्सअभावी अनेक रुग्णांचे पुन्हा ऑपरेशन करावे लागत आहे. निदान यापुढे तरी काही प्रमाणात इंजेक्शन्स वाढली, तरच रुग्णांना लवकर बरे करणे शक्य होणार आहे; अन्यथा आजार वाढत जाण्याचीच शक्यता अधिक आहे.
-डॉ. पुष्कर लेले, कान, नाक, घसातज्ज्ञ