सुरू होण्यापूर्वीच रद्द झाली अमरावती रेल्वे गाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 00:27 IST2021-01-21T20:36:00+5:302021-01-22T00:27:16+5:30
मनमाड : प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने येत्या २५ जानेवारीपासून अमरावती- मुंबई व पुरी- अजमेरदरम्यान विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, रेल्वे प्रशासनाकडून यातील अमरावती- मुंबई ही विशेष गाडी सुरू होण्यापूर्वीच रद्द करण्यात आली आहे. जिल्ह्यातील मनमाड व नाशिक स्थानकावर थांबा असलेली ही गाडी रद्द करण्यात आल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

सुरू होण्यापूर्वीच रद्द झाली अमरावती रेल्वे गाडी
मनमाड : प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने येत्या २५ जानेवारीपासून अमरावती- मुंबई व पुरी- अजमेरदरम्यान विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, रेल्वे प्रशासनाकडून यातील अमरावती- मुंबई ही विशेष गाडी सुरू होण्यापूर्वीच रद्द करण्यात आली आहे. जिल्ह्यातील मनमाड व नाशिक स्थानकावर थांबा असलेली ही गाडी रद्द करण्यात आल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
येत्या २५ जानेवारीपासून सुरू करण्यात येणारी गाडी क्रमांक ०२११२ अप अमरावती- मुंबई विशेष गाडी आणि गाडी क्रमांक ०२१११ डाऊन मुंबई-अमरावती विशेष गाडी ही पुढील आदेश येईपर्यंत रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. अमरावती- मुंबई गाडी दररोज अमरावतीहून १९.१० वाजता रवाना होऊन दुसऱ्या दिवशी मुंबईला ६.१५ वाजता पोहोचणार होती. भुसावळ, जळगाव, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, नांदुरा, मलकापूरबरोबरच नाशिक रोडलाही तिला थांबा असल्याने नाशिककरांची मोठी सोय होणार होती. दरम्यान गाडी क्रमांक ०२०३७ अप पुरी- अजमेर विशेष गाडी दिनांक २१ जानेवारीपासून दर सोमवार व गुरुवारी पुरी स्टेशनहून २३.०५ वाजता रवाना होईल आणि तिसऱ्या दिवशी अजमेर स्टेशनवर १८.५५ वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०२०३८ डाऊन अजमेर- पुरी विशेष गाडी दिनांक २६ जानेवारीपासून दर मंगळवार व गुरुवारी अजमेर स्टेशनहून १८.५० वाजता रवाना होईल आणि तिसऱ्या दिवशी पुरी स्टेशनला १४.२५ वाजता पोहोचेल.
कोरोनाचे नियम बंधनकारक
केवळ आरक्षित तिकीट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल. प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविडशी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागणार आहे.