कुमारी मातेने केला त्याग अन वर्षभरात अमेरिकन पालकांच्या कुशीत विसावली बालिका
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2023 05:26 PM2023-02-16T17:26:41+5:302023-02-16T17:30:02+5:30
कुमारी मातेच्या पोटी जन्माला आलेल्या बालिकेचा अपरिहार्य कारणास्तव मातेने त्यागपत्राद्वारे त्याग केला अन् तिच्या संगोपनाची जबाबदारी नाशिकच्या आधाराश्रम संस्थेने लिलयापणे पार पाडली.
नाशिक, (अझहर शेख) -कुमारी मातेच्या पोटी जन्माला आलेल्या बालिकेचा अपरिहार्य कारणास्तव मातेने त्यागपत्राद्वारे त्याग केला अन् तिच्या संगोपनाची जबाबदारी नाशिकच्या आधाराश्रम संस्थेने लिलयापणे पार पाडली. भारत सरकारच्या ‘कारा’ बाल दत्तक प्रणालीद्वारे वर्षभराच्या ‘आशी’ला थेट अमेरिकच्या सुक्षिक्षित दाम्पत्याने दत्तक घेतले. जन्मत: एक मुत्रपिंड निकामी असल्याने आशीचा विशेष काळजीच्या बालकांच्या गटात समावेश होता. या बालिकेची दत्तक प्रक्रिया मागील आठ महिन्यांपासून सुरु होती.
नाशिक शहरातील एका कुमारी मातेच्यापोटी जन्माला आलेल्या या बालिकेचा तिच्या मातेने बालकल्याण समितीपुढे त्यागपत्र लिहून त्याग केला. या बालिकेचे एक मुत्रपिंड जन्मत: निकामी व जीभ टाळूला चिकटलेली होती. यामुळे हे बालक विशेष काळजीतील होते. बालकल्याण समितीकडून त्यागपत्राद्वरे आधाराश्रमात बालिकेला सोपविण्यात आले. समन्वयक राहुल जाधव यांनी प्रक्रिया पूर्ण करत बालिकेच्य संगोपनाची जबाबदारी स्वीकारली. वर्षभरात ही बालिका आधाराश्रमातील सर्वांची लाडकी बनली. तिला ‘आशी’ असे नाव देण्यात आले.
महिला व बालविकास विभागाच्या मान्यताप्राप्त आधाराश्रमात अनाथ व निराधार बालकांच्या संगोपन व पुर्नवसनाचे कार्य मागील ६८ वर्षांपासून करण्यात येते. केंद्रीय दत्तक ग्रहन संसाधन (सी.ए.आर.ए) अर्थात ‘कारा’च्या यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार २०२२सालच्या रेग्युलेशन लागू करण्यात आले. त्यानुसार आज जिल्ह्यातील आधाराश्रम संस्थेतील या बालिकेला उत्तर अमेरिकास्थित डेविन व लायनी जमशेदी या दाम्पत्याने दत्तक घेतले आहे, अशी माहिती आधाराश्रमाचे व्यवस्थापक तथा समन्वयक राहुल जाधव यांनी दिली.
प्रथमच जिल्हाधिकारी कार्यालयात प्रक्रिया
नाशिकचे जिल्हाधिकारी गंगाथरण डी., यांच्य कार्यालयात प्रथमच परदेशी दाम्पत्याकडे बालक दत्तक देण्याची प्रक्रिया मंगळवारी (दि.१४) पार पडली. त्यांच्या दालनात जमशेदी दाम्पत्याकडे आशीला सोपविण्यात आले. याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, महिला व बालविकास अधिकारी अजय फडोळ, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी समीरा येवले, आधाराश्रमाचे व्यवस्थापक तथा समन्वयक राहूल जाधव आदि उपस्थित होते.
जमशेदी दाम्पत्य जुळ्या बालकांचे आई-वडील
डेविन जमशेदी हे व्यावसायिक असून त्यांची पत्नी लायनी जमशेदी या अमेरिकेत शिक्षिका म्हणून नोकरी करतात. दत्तक नियमावलीनुसार आशी हे बालक विशेष काळजीचे असल्याने तिच्यावर आता पुढील वैद्यकिय उपचार अमेरिकेत जमशेदी दाम्पत्याकडून केले जाणार आहे. या दाम्पत्याला यापुर्वी जुळी बालके आहेत. तरीही त्यांनी आशीला दत्तक घेण्याची इच्छा दर्शवून तिला मातृत्वाचा आधार दिला.