नदीपात्रात केमिकलयुक्त पाणी; केटीवेअर बंधाऱ्यातील दूषित पाण्यामुळे मासे मृत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2023 07:23 PM2023-03-20T19:23:01+5:302023-03-20T19:23:17+5:30
नाशिक येथील केटीवेअर बंधाऱ्याच्या पूर्व बाजूला नदीपात्रात केमिकलयुक्त पाणी दिसून आल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.
बाबा गिते
खेडलेझुंगे (नाशिक) : येथील केटीवेअर बंधाऱ्याच्या पूर्व बाजूला नदीपात्रात केमिकलयुक्त पाणी दिसून आल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. सोमवारी (दि.२०) सकाळी केमिकलयुक्त पाणी पिल्यामुळे येथील पशुधन धोक्यात आलेले आहे. अनेक प्राण्यांना जुलाब सुरू झाल्याची माहिती परिसरातील पशुधन पालकांनी दिलेली आहे. तसेच केमिकलयुक्त पाण्यामुळे मोठ्या प्रमाणावर मासे मृत होऊन किनारी त्यांचा खच पडल्याचे दृश्य नदी परिसरात दिसत आहे.
सोमवारी दुपारी १ वाजपर्यंत सदर केमिकलयुक्त पाणी केटिवेअर धरणापासून ते कोळगावकडे सुमारे एक किमीपर्यंत (पूर्वेकडे) पसरले होते. या पाण्यामुळे मोठी जीवित हानी होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. पाण्यामध्ये मिसळलेल्या केमिकलचा उग्र वास परिसरामध्ये पसरला आहे. केटीवेअर धरणाच्या दरवाजाजवळ पाण्यात केमिकलचे गोळे असल्याचे प्रत्यक्षदर्शनी दिसून आले. धरणाच्या दरवाजावरून पडणाऱ्या पाण्याच्या धारेबरोबर हे केमिकल पाण्यात मिसळल्याने पाण्याचा रंग पांढरा होऊन पाणी प्रवाहित होत आहे. केमिकलची तीव्रता जास्त असल्याने नदीपात्रात केटिवेअर धरणाच्या पूर्व बाजूचे पाणी पांढरे तर पश्चिम बाजूचे पाणी निळेशार दिसत आहे.
सदरच्या केमिकलची तीव्रता जास्त असल्याने पाण्यातील मासे, खेकडेसह व इतर जलचर मृत पावत आहे. या खराब पाण्यामुळे नियमित धरणाच्या पाण्यात मासे पकडून आपली गुजराण करणाऱ्यांना आज मासे न मिळाल्यामुळे त्यांना रिकाम्या हाती परतावे लागले. याच दरम्यान नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर मासे मृत होऊन ते किनाऱ्यावर आलेले आहेत. तर काही मासे पाण्यावर तडफडताना दिसून येत आहे.
यासंदर्भात शासकीय यंत्रणेच्या अधिकारी वर्गाशी येथील ग्रामस्थांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यांना काही अधिकारी वर्गाकडून शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करत आहोत तर काही अधिकारी संपात असल्याचे सांगत असल्यामुळे शासकीय यंत्रणा दुपारपर्यंत घटनास्थळी पोहचलेली नव्हती.