आठ दिवसांच्या बाळाला टाकून दिले शौचालयात, नाशिकच्या पाथर्डीगावातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2024 01:15 PM2024-03-06T13:15:19+5:302024-03-06T13:16:03+5:30
माणुसकीला कलंक लावणारे हे कृत्य करताना ‘त्या’ अज्ञात स्त्री किंवा पुरुषाचे काळीज थरथरलं नसेल का.., असा प्रश्नही जनमानसातून उपस्थित होत आहे.
नाशिक : मातृत्व अन् पितृत्व मिळविण्यासाठी वंध्यत्वाशी लढा देणारी अनेक जोडपे समाजात वावरत आहेत. दुसरीकडे एका जोडप्याने त्यांचे जन्मलेले अवघ्या आठ दिवसांचे पुरुष जातीचे बाळ एका सार्वजनिक शौचालयाच्या भांड्यात टाकून पळ काढला. माणुसकीला कलंक लावणारे हे कृत्य करताना ‘त्या’ अज्ञात स्त्री किंवा पुरुषाचे काळीज थरथरलं नसेल का.., असा प्रश्नही जनमानसातून उपस्थित होत आहे.
पाथर्डीगावातील एका सार्वजनिक शौचालयामध्ये सोमवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. महापालिकेचे सफाई कर्मचारी शौचालयाची स्वच्छता करण्यासाठी आले असता, तेथील एका भांड्यात त्यांना मृतावस्थेत नवजात शिशू आढळून आले. त्यांनी तत्काळ त्यांच्या सुपरवायझरला घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून हे कृत्य करणाऱ्या व्यक्तींचा शोध सुरू केला आहे.
अनैतिक संबंधाचा व्यक्त होतोय संशय
अनैतिक संबंधातून बाळ जन्माला आले असावे. त्यामुळे संबंधितांनी कोणाच्या नजरेत येऊ नये, म्हणून बाळाला अशाप्रकारे शौचालयात टाकून पळ काढला असावा, अशी चर्चा परिसरात सुरू होती.