नाशिकचे स्वच्छतादूत चंद्रकांत पाटील यांना मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रण
By संजय पाठक | Published: June 9, 2024 12:36 PM2024-06-09T12:36:01+5:302024-06-09T12:36:35+5:30
आज संध्याकाळी दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात पार पडणार शपथविधी सोहळा
संजय पाठक, नाशिक- नाशिकचे स्वच्छतादूत पर्यावरण कार्यकर्ते चंद्रकिशोर पाटील यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज होणाऱ्या शपथविधी सोहळ्यासाठी विशेष अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. चंद्रकांत पाटील हे नाशिकच्या नंदिनी नदी जवळ वास्तव्यास असून ही नदी स्वच्छ राहावी यासाठी जनजागृती करून स्वतः ही नदी स्वच्छ करतात याशिवाय गोदावरी नदी आणि नाशिक शहराचे स्वच्छतेसाठी जनजागृती करण्याचे काम ते करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' या कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांच्या कार्याचा गौरवही केला होता. त्याच प्रमाणे दिल्लीत बोलावून त्यांचा गौरव केला होता.
महाराष्ट्रातून कोण होणार मंत्री?
मोदींच्या तिसऱ्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील सहा खासदारांची नावे जवळपास निश्चित आहेत तर एका खासदाराबाबत चर्चा सुरु आहेत. भाजपाकडून महाराष्ट्रात निवडून आलेल्यांपैकी माजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पीयूष गोयल यांना पुन्हा मंत्रिपद मिळणार आहे. तर रिपाईंचे रामदास आठवले यांनाही पुन्हा राज्यमंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय भाजपाकडून सलग तिसऱ्यांदा खासदार बनलेल्या रावेरच्या रक्षा खडसे यांना आणि पुण्यातून महापौर पदावरून थेट खासदार झालेले मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिपदाच्या शपथेसाठी फोन आला असल्याची माहिती आहे. त्यासोबतच एकनाथ शिंदे यांनी ७ खासदार निवडून आल्यानंतर, त्यांच्यापैकी बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांना शपथविधीसाठी फोन आल्याचे सांगितले जात आहे. महाराष्ट्रातील सहा खासदारांच्या व्यतिरिक्त अजित पवार गटाचे राज्यसभा खासदार प्रफुल पटेल यांचेही नाव चर्चेत आहे. परंतु त्यांना अद्याप फोन आलेला नाही, असे सांगितले जात आहे.