नाशिकमध्ये भरदिवसा घरात शिरून वृद्धेचा विळ्याने चिरला गळा; रहिवाशांचा थरकाप
By अझहर शेख | Updated: July 10, 2024 17:01 IST2024-07-10T16:58:32+5:302024-07-10T17:01:26+5:30
कुसुम सुरेश एकबोटे असे खून झालेल्या आजीचे नाव आहे. या घटनेने म्हसरूळ परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, सर्वत्र खळबळ उडाली आहे.

नाशिकमध्ये भरदिवसा घरात शिरून वृद्धेचा विळ्याने चिरला गळा; रहिवाशांचा थरकाप
नाशिक : दिंडोरीरोडवरील म्हसरूळ परिसरातील गुलमोहरनगर येथील राधानंद इमारतीच्या एका सदनिकेत शिरून अज्ञात हल्लेखोराने भरदिवसा ८५ वर्षीय आजीबाईचा विळ्याने गळा चिरून खून केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि.१०) सकाळी ११ वाजता समोर आली. कुसुम सुरेश एकबोटे असे खून झालेल्या आजीचे नाव आहे. या घटनेने म्हसरूळ परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, सर्वत्र खळबळ उडाली आहे. हल्लेखोर फरार असून, पोलिसांची पथके त्याचा शोध घेत आहेत.
म्हसरूळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुलमोहरनगरमध्ये राधानंद अपार्टमेंट आहे. या इमारतीच्या एका सदनिकेत तीन वर्षांपासून कुसुम एकबोटे व त्यांची मुलगी ज्योती एकबोटे या भाडेतत्त्वावर राहतात. ज्योती एकबोटे यादेखील वृद्ध असून, त्या इतरांच्या घरी पोळ्या लाटण्याचे काम करून उदरनिर्वाह चालवतात. बुधवारी सकाळी त्या नेहमीप्रमाणे कामावर गेल्या. परिसरात घंटागाडी आल्याने कुसुम एकबोटे या कचरा टाकण्यासाठी खाली आल्या. त्यानंतर त्या पुन्हा दुसऱ्या मजल्यावरील त्यांच्या फ्लॅटमध्ये गेल्या. दरम्यान हल्लेखोराने घरात प्रवेश करत त्यांच्या मानेवर धारधार विळ्याने वार करून त्यांचा खून केला असावा, अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. सहायक पोलिस आयुक्त नितीन जाधव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुभाष ढगळे यांच्या पथकाने पंचनामा करून मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला.
याप्रकरणी उशिरापर्यंत म्हसरूळ पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १०३ नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. एकबोटे यांच्या पश्चात दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. भरदिवसा घडलेल्या खुनाच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. नाशिकमध्ये चार दिवसात खुनाची ही दुसरी घटना घडली आहे.