...अन् नेटिझन्स म्हणे, बिबट्या नाशिकच्या ‘गस्ती’वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 10:18 PM2020-05-30T22:18:03+5:302020-05-30T22:18:55+5:30
‘आपके शहर में तो कुत्ते घुमते होंगे, लेकिन हमारे नासिक में बिबट्या घुमता हैं...
नाशिक : नाशिककरांनी घरात बसावे, म्हणून बिबट्या रस्त्यांवर.... लॉकडाऊनच्या यशस्वीतेसाठी बिबट्याची गस्त... आता मी रस्त्यांवर तुम्ही घरात थांबा... आली लहर बिबट्याने केला कहर... रात्री २ वाजता बिबट्याने घेतली कॉफी..., नाशिककर सावधान, कोरोनासोबत बिबट्याचा धाक... अशा एक ना अनेक पोस्ट सोशलमिडियावर दिवसभर व्हायरल होत होत्या. यासोबतच अनेक नेटिझन्सकडून बिबट्याचे सीसीटीव्ही फुटेजचे व्हिडिओदेखील शेअर केले गेले.
बिबट्याचा मुक्त संचार शनिवारपासून शहरात सुरू झाल्याच्या बातमीनंतर शहरातील नेटिझन्सचेदेखील याकडे लक्ष वेधले गेले. शुक्रवारी दिवसभर सोशलमिडियावरून सावधानतेचा ‘इशारा’ दिला जात होता; मात्र शनिवारी इंदिरानगरमधील राजसारथी सोसायटीच्या सीसीटीव्ही फुटेज आणि सुयश हॉस्पिटल, एसएसके हॉटेचल्या फुटेजने शहरात बिबट्याचा वावर मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत पुन्हा वाढला यावर शिक्कामोर्तब झाले. त्यानंतर सकाळपासून दिवसभर नेटिझन्सकडून याबाबत सोशलमिडियावर बिबट्या ‘अॅक्टिव’ ठेवण्यात आला. बिबट्याच्या संचाराबद्दल विविध अफवांनाही सुर्यास्तानंतर ऊत आल्याने वनविभागाच्या गस्तीपथकाची चांगलीच दमछाक सुरू झाली.
‘आपके शहर में तो कुत्ते घुमते होंगे, लेकिन हमारे नासिक में बिबट्या घुमता हैं... घर में रहो, इसी में अब हम सब की भलाई हैं... नाशिकच्या यंत्रणेला दोन दिवसांपासून बिबट्याची मिळतेय साथ असे विनोदही वायरल होत होते. नाशिक बिबट्या नावाने हॅशटॅगसह ट्रेन्ड सोशलमिडियावर पहावयास मिळाला.
शहरात बिबट्याच्या मुक्त संचाराने एकीकडे वनविभागाची झोप उडाली असून दुसरीकडे मात्र नेटिझन्सकडून सोशलमिडियावर बिबट्याला सतत फिरविले जात आहे. सीसीटीव्हीत कैद झालेला बिबट्याच्या संचाराचे व्हिडिओ, फोटोंना सोशलमिडियावर पेव फुटल्याचे चित्र होते.