आनंद भाटे यांच्या स्वराविष्काराने रसिक मंत्रमुग्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 12:07 AM2017-10-23T00:07:08+5:302017-10-23T00:07:18+5:30
भाऊबीजची मंगलमय पहाट, उगवत्या सूर्याचा किरमीजी रंग आणि सोबत गुलाबी थंडीत ज्येष्ठ शास्त्रीय गायक आनंद भाटे यांनी सादर केलेल्या स्वराविष्काराने उपस्थित श्रोते मंत्रमुग्ध झाले. निमित्त होते ‘भाऊबीज पहाट’ कार्यक्रमाचे. शनिवारी (दि. २१) गंगापूररोड येथील प्रमोद महाजन उद्यानात दीपावलीनिमित्त ज्येष्ठ शास्त्रीय गायक आनंद भाटे यांच्या संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले होते.
नाशिक : भाऊबीजची मंगलमय पहाट, उगवत्या सूर्याचा किरमीजी रंग आणि सोबत गुलाबी थंडीत ज्येष्ठ शास्त्रीय गायक आनंद भाटे यांनी सादर केलेल्या स्वराविष्काराने उपस्थित श्रोते मंत्रमुग्ध झाले. निमित्त होते ‘भाऊबीज पहाट’ कार्यक्रमाचे. शनिवारी (दि. २१) गंगापूररोड येथील प्रमोद महाजन उद्यानात दीपावलीनिमित्त ज्येष्ठ शास्त्रीय गायक आनंद भाटे यांच्या संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. मैफलीच्या सुरुवातीला गायक आनंद भाटे यांनी ‘जोगिया मोरे घर आये’ ही तीन तालातील बंदीश सादर केली. यानंतर ‘वद जाऊ कु णाला शरण’ हे नाट्यगीत, ‘काया ही पंढरी आत्मा पांडुरंग’ हे भक्तिगीत यासह वैविध्यपूर्ण गाण्याचे सादरीकरण करत रसिकांची दाद मिळवली. ही संगीत मैफल उत्तरोत्तर रंगत असताना ‘जोहार माय बाप जोहार’ या कानडी अभंगाने कार्यक्रमात विशेष रंगत आणली.
संगीत मैफलीच्या अखेरीस आनंद भाटे यांनी ‘बाजे रे मुरलीया बाजे’ही रचना सादर केली तर ‘चिन्मया सकल हृदया’ या नावाजलेल्या भैरवीने या संगीत मैफलीची सांगता झाली. यावेळी आनंद भाटे यांना भरत कामत (तबला), राहुल गोळे (संवादिनी), दिगंबर सोनवणे (पखवाज), सागर मोरस्कर (तालवाद्ये) यांनी साथ संगत केली तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना मिलिंद कुलकर्णी यांनी आपल्या खुमासदार निवेदनाने प्रेक्षकांना खिळवून ठेवले. मध्य नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे आणि भाजपा प्रवक्ते सुहास फरांदे यांच्या प्रमुख संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास रसिकांनी विशेष दाद दिली. या संगीत मैफलीस महापौर रंजना भानसी, पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल, महिला आणि बालकल्याण विभागाच्या सचिव विनिता सिंगल, दिल्लीतील ‘लोकमत’चे राजकीय संपादक सुरेश भटेवरा, ‘लोकमत’चे निवासी संपादक किरण अग्रवाल, आमदार बाळासाहेब सानप, मनपा सभागृह नेते दिनकर पाटील, भाजपा प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी, अॅड. नंदकिशोर भुतडा, डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, अॅड. नितीन ठाकरे आदींसह विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गप्पा-सुरांची ‘भाऊबीज पहाट’
नाशिकच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणाºया पाडवा पहाट मैफलीप्रमाणेच शहरात भाऊबीज पहाट कार्यक्रमाचे आयोजन होऊ लागले आहे. शनिवारी नाशिककरांना स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांचे शिष्य असलेले गायक आनंदगंधर्व आनंद भाटे यांच्या सांगीतिक मेजवानीची पर्वणी मिळाली. विविध मान्यवरांचे किस्से गप्पांच्या ओघात मांडताना सजलेली ही मैफल उत्तरोत्तर अधिकच खुलत गेली. यावेळी गायक आनंद भाटे यांनी सादर केलेल्या वैविध्यपूर्ण गीतांना नाशिककर रसिकांनी विशेष दाद दिली.