सर्वधर्मीय वारकऱ्यांना सामावून घेणारा आनंद सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 12:14 AM2018-07-23T00:14:07+5:302018-07-23T00:14:25+5:30
संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ संजीवन समाधी सोहळ्याला ७२१ वर्ष झाले असून, गेल्या सात शतकांपासून त्र्यंबकेश्वर येथून हा वारीचा अनुपम सोहळा निरंतर सुरूच आहे. त्यापूर्वीही वारीची परंपरा सुरूच होती.
संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ संजीवन समाधी सोहळ्याला ७२१ वर्ष झाले असून, गेल्या सात शतकांपासून त्र्यंबकेश्वर येथून हा वारीचा अनुपम सोहळा निरंतर सुरूच आहे. त्यापूर्वीही वारीची परंपरा सुरूच होती. संत नामदेव महाराजांनी संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांच्या समाधी सोहळ्याला आपल्या भक्त व परिवारासह येथे हजेरी लावली होती. वारकरी संप्रदायात वारीचे अनन्य साधारण महत्त्व आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपºयातून दिंड्या आणि पालख्या येतात. तीर्थक्षेत्र आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी निघते. तर तीर्थक्षेत्र देहू येथून संत तुकाराम महाराजांची पालखी निघते. शेगावाहून गजानन महाराजांची पालखी येते. परभणी जिल्ह्यातून संत नामदेव महाराजांची पालखी तर पैठण येथून संत एकनाथ महाराजांची पालखी येते. खान्देशातून संत मुक्ताबार्इंची पालखी निघते. याशिवाय अनेक संतांच्या पालख्या येतात. सर्व जाती-जमातीचे लोक यामध्ये सहभागी झालेले असतात.
‘विठु माझा लेकुरवाळा।
संगे गोपाळांचा मेळा।।’
असा आनंद सोहळा असतो. एकप्रकारे आध्यात्मिक आनंद या वारीमधून मिळतो. त्यामुळे जन्मभरात एकदा तरी वारी करावी, असे म्हटले जाते.
‘सुखा लागे करीशी तळमळ ।
तरी तू जाय एकवेळ, पंढरपूर।।
मग, तू अवघाची सुखरूप होशी ।
दु:ख विसरशी, तू जन्मोजन्मीचे ।।
असे या वारीचे माहात्म्य सांगण्यात येते. आमच्या परिवारात वारीची परंपरा पूर्वीपासून आहे. माझ्या वडिलांनी हयातभर पंढरीची वारी केली. मीदेखील संत ज्ञानेश्वरांच्या पालखीसोबत गेलो आहे. संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांच्या पालखीसोबत वारी केली आहे. संत निवृत्तिनाथ संस्थानचा अध्यक्ष असतानाच्या काळात वारकºयांना सोयी-सुविधा मिळाव्यात म्हणून नेहमीच प्रयत्न केला. पूर्वी वारकºयांची संख्या कमी असायची. आता दरवर्षी वारकºयांची संख्या वाढत आहे. पूर्वी बैलगाडीतून पालखी नेत असत, सामान वाहन्यासाठीदेखील फारशी साधने नव्हती. आता पालखीसाठी रथ बनविण्यात आलेला आहे. सामान नेण्यासाठी वाहने असतात. त्याचबरोबर पाण्याचा टँकर, रुग्णवाहिका, पुरेशी औषधी आणि डॉक्टरांचे पथकदेखील असते. वारीमध्ये तरुणांची संख्या वाढते आहे. काळानुरूप वारीत बदल होत आहे. तरुणवर्ग धार्मिक आध्यात्मिकतेकडे वळत असून, ही समाधानाची बाब आहे. - त्र्यंबकराव गायकवाड
(लेखक, संत निवृत्तिनाथ संस्थानचे माजी अध्यक्ष आहेत.)