सव्वा कोटीचे भाडे मागितल्याने आनंद नगर बस डेपोवर फुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 04:24 AM2020-12-03T04:24:22+5:302020-12-03T04:24:22+5:30
शहर बस वाहतूक सुरू करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने सुरुवातीपासूनच हात झटकण्याची भूमिका घेतली आहे. बस सेवेत तोटा होत असल्याचे ...
शहर बस वाहतूक सुरू करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने सुरुवातीपासूनच हात झटकण्याची भूमिका घेतली आहे. बस सेवेत तोटा होत असल्याचे कारण देतानाच शहर बस वाहतूक ही महापालिकेची जबाबदारी असल्याचे सांगून अंग काढण्याचे धोरण स्वीकारले. तब्बल सहावेळा बस सेवेचा प्रस्ताव फेटाळल्यानंतर देखील पुन्हा नाशिक महापालिकेच्या गळ्यात ही सेवा टाकण्यात महामंडळाला यश आले. मुळात नाशिक महापालिकेने बस सेवा चालवावी काय याबाबत शासनाकडे बैठक झाली तेव्हा मनपा आणि महामंडळ यांच्या संयुक्त उपक्रमातून ही सेवा चालवण्याचा प्रस्ताव होता; मात्र त्यावेळी देखील महामंडळाने नकार दिला. आता ही सेवा महापालिकेच्या माध्यमातून देण्याचा निर्णय झाल्यानंतर काही ठिकाणी निमाणी, महामार्ग असा बस डेपोचा वापर शेअरिंग पद्धतीने करण्याचा देखील प्रस्ताव आहे.
नव्या शहर बस वाहतुकीला आता गती आली असून १ जानेवारीपासून महापालिका चाचणी करणार आहे. नाशिक रोड येथील सिन्नर फाटा येथे बस डेपो करतानाच मुक्तीधाम जवळील आनंदनगर येथील बस डेपो महापालिकेने भाड्याने घेण्याचा प्रस्ताव होता. मात्र, महामंडळाने तब्बल सव्वाकोटी भाडे कळवल्याने अखेरीस महापालिकेने त्याचा नाद सोडल्याचे वृत्त आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी देखील त्यास दुजोरा दिला.
इन्फो...
बस भाड्याबाबत लवकर निर्णय
महापालिकेची बस सेवा सुरू करण्यासाठी प्रशासन गतिमान झाले असून आता लवकरच बस भाडे ठरवण्यात येणार आहे. हे भाडे सध्याच्या बस भाड्याप्रमाणेच ठेवण्याची शक्यता आहे. नवीन प्रवासी आले पाहिजेत परंतु कमी भाडे ठेवून महापालिकेला तोटाही वाढता कामा नये याचा विचार करून अशाप्रकारे निर्णय घेण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.