...अन् नाशिककर गारठले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:10 AM2020-12-07T04:10:06+5:302020-12-07T04:10:06+5:30
विदर्भापाठोपाठ उत्तर महाराष्ट्रासह संपूर्ण राज्यभरात बोचऱ्या थंडीने जोरदार पुनरागमन केले आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून थंडीची पुन्हा लाट ...
विदर्भापाठोपाठ उत्तर महाराष्ट्रासह संपूर्ण राज्यभरात बोचऱ्या थंडीने जोरदार पुनरागमन केले आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून थंडीची पुन्हा लाट आली आहे. शहराच्या किमान तापमानासह कमाल तापमानातही वेगाने घसरण होताना दिसत आहे. रविवारी शहराचे कमाल तापमान २९.३ अंश (सेल्सिअस) इतके नोंदविले गेले. कमाल तापमानाचा पारा ३१ अंशांवरून खाली येत असून, किमान तापमानदेखील १७ अंशांवरून मागील तीन दिवसांत वेगाने घसरत आहे. या ऋतुबदलाचा मानवी आरोग्यावरही परिणाम होताना दिसत आहे.
नाशिककरांनी कडाक्याच्या थंडीपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी पुन्हा उबदार कपड्यांच्या वापरास प्राधान्य दिले आहे. गोदाकाठासह शहरातील झोपडपट्ट्यांच्या भागात तसेच गावठाण भागासह शहरालगतच्या खेड्यांमध्ये सायंकाळनंतर शेकोट्याही पेटू लागल्या आहेत. रविवारी राज्यात सर्वाधिक कमी नीचांकी तापमानाची नोंद पुणे येथे १०.४ अंश इतकी करण्यात आली. त्यापाठोपाठ नाशकात १०.६ अंश इतके किमान तापमान नोंदविले गेले.
---इन्फो--
...असे घसरला शहराचा पारा शहराचे किमान तापमान .(अंश सेल्सिअसमध्ये)
दिनांक - किमान तापमान
३० नोव्हें- १७.०
१ डिसें- १७.८
२ डिसें- १६.४
३ डिसें- १३.०
४ डिसें- १४.०
५ डिसें- ११.१
६ डिसें- १०.६
--इन्फो--
फुलले शहरातील जॉगिंग ट्रॅक
थंडीची तीव्रता पुढील आठवडाभर शहरात कायम राहणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविली जात आहे. पहाटेच्या सुमारास थंडीचा कडाका अधिक जाणवत असला तरी सकाळी व्यायामप्रेमींच्या उत्साहावर त्याचा कुठलाही परिणाम झालेला सध्या दिसून येत नाही. हौशी व्यायामप्रेमींची संख्या अधिक वाढू लागली आहे. शहरातील मध्यवर्ती भागासह गंगापूररोड, कॉलेजरोड, इंदिरानगर, गोविंदनगर, कृषिनगर, डीजीपीनगर, रविशंकर मार्ग, अशोकामार्ग, उपनगर आदी भागांमधील जॉगिंग ट्रॅकवर सकाळ-संध्याकाळ फेरफटका मारणाऱ्यांच्याही संख्येत वाढ झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे-
---
...आला आरोग्यवर्धक हिवाळा
हिवाळा ऋतू आरोग्यवर्धक मानला जात असल्यामुळे बहुतांश तरुण व्यायामप्रेमी बोचऱ्या थंडीकडे दुर्लक्ष करीत ‘वॉर्मअप’द्वारे ऊर्जा निर्माण करत व्यायामावर भर देत आहे. ग्रीन जीमचा वापरही वाढला असून, शरीरासाठी गुणकारी असलेल्या विविध औषधी रसांनाही मागणी मिळत आहे. व्यायाम करताना जॉगिंगट्रॅकवर मिळणाऱ्या विविध पालेभाज्या, फळभाज्यांसह आवळासारख्या औषधी गुणधर्म असलेल्या फळांच्या रसाची विक्री हंगामी विक्रेते करताना दिसत आहे.
---
फोटो ०६पीएचडीसी/६९/७०/७१