निवृत्त कलाशिक्षिकेचा ज्येष्ठांसाठी ‘आनंदाश्रम’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 01:08 AM2018-01-28T01:08:08+5:302018-01-28T01:09:20+5:30
निवृत्त कलाशिक्षिकेचा ज्येष्ठांसाठी ‘आनंदाश्रम’
नाशिक : रक्ताचे नातेही जेव्हा बेईमान होते आणि आपल्या हक्काच्या घरातून बेघर व्हायची वेळ येते, अशावेळी जीवनयात्रा संपविण्यापलीकडे ज्येष्ठांपुढे दुसरा पर्याय उरत नाही. ज्येष्ठांची ही परवड थांबविण्यासाठी शहरातील सारडा कन्या विद्यामंदिरातील निवृत्त कलाशिक्षिका पूर्णिमा आठवले यांनी ‘आनंदाश्रम’ची संकल्पना मांडली असून, सदरचा प्रकल्प तडीस नेण्यासाठी त्यांची अविरत धडपड सुरू आहे. महापालिकेकडे त्यांनी जागेची मागणी केली असून उर्वरित सारा खर्च पेलण्याची तयारी दर्शविली आहे. महापालिकेतील मुखंडांना ज्येष्ठांच्या भयावह स्थितीबाबत पाझर फुटला तर ‘आनंदाश्रम’मधून अनेक ज्येष्ठांची आयुष्याची सायंकाळ सुखद बनू शकेल.
सारडा कन्या विद्यामंदिरात ३२ वर्षे कलाशिक्षक म्हणून सेवा बजावल्यानंतर पूर्णिमा आठवले या २००६ मध्ये निवृत्त झाल्या. निवृत्तीनंतर त्यांनी आपल्यातील कलेचे धडे विद्यार्थ्यांना देण्याचे कर्म सुरूच ठेवले परंतु, सभोवताली ज्येष्ठ, एकाकी वृद्धांची जगण्यासाठी चाललेली लढाई पाहून त्या अस्वस्थ झाल्या. मध्यमवर्गीयांपासून उच्चभ्रूपर्यंत ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या काही केल्या कमी व्हायला तयार नाहीत. ते हक्काच्या घरात घुसमट होते आहे. तळहातावरील फोडाप्रमाणे जपलेली मुलेही बेईमान बनत चालली आहेत. घरात वावरताना असंख्य निर्बंध येऊन पडतात. अशा साºया वातावरणात क्षणभराची विश्रांतीही नकोशी वाटायला लागते आणि त्यातूनच असंख्य वृद्ध आपला वेळ मंदिर, उद्याने, वाचनालये याठिकाणी तासन्तास घालवतात. एकाकी वृद्धांची तर मोठीच ससेहोलपट होते. अशा वृद्धांनी दिवसभर आपला वेळ ‘आनंदाश्रम’मध्ये घालवावा, त्यांचे रंजन व्हावे, मनमोकळ्या गप्पा व्हाव्यात यासाठी पूर्णिमा आठवले यांनी ध्यास घेतला आणि सदर प्रकल्प राबविण्यासाठी त्यांची वयाच्या सत्तरीतही धडपड सुरू आहे. आनंदाश्रमासाठी जागा मिळावी म्हणून महापौर, आयुक्तांसह थेट मुख्यमंत्री, पालकमंत्री यांनाही साकडे घातले आहे. या प्रकल्पात शहरातील ज्येष्ठांनीही सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. पुरेशी जागा उपलब्ध झाल्यास उर्वरित खर्च पेलण्याची तयारी त्यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी दर्शविली आहे. त्यांच्या प्रयत्नांना बळ मिळाल्यास, शहरातील ज्येष्ठांना हक्काचे रंजनाचे एक स्थान उपलब्ध होऊ शकेल.
शहरात काही वृद्धाश्रम, आरोग्य केंद्रे आहेत. मात्र, ही यंत्रणा पुरेशी ठरत नाही. महापालिकेकडून जागा मिळावी, एवढीच आमची माफक अपेक्षा आहे. त्यातून आनंदाश्रमाची निर्मिती करता येईल आणि ज्येष्ठांसाठी दिवसभरासाठी चहा, नास्ता, जेवण, मनोरंजन व गरज पडल्यास वैद्यकीय सुविधा पुरविता येईल. अनाथ, बेघर यांनाही आधार दिला जाईल. निवृत्तीधारकांना योग्य शुल्क आकारून डे केअर सेंटर सुरू करण्याचाही मानस आहे. शहर-परिसरात अनेक ठिकाणी तळमजल्यावरील फ्लॅट्स, बंगले रिकामे आहेत. त्यांचे मालक बाहेरगावी वास्तव्यास असतात. त्यांनीही या कार्याला हातभार लावावा. - पूर्णिमा आठवले, निवृत्त कलाशिक्षिका