तीन एकर कोबीवर नांगर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 12:12 AM2018-04-14T00:12:57+5:302018-04-14T00:12:57+5:30
गारपीट, अवकाळी अशा अस्मानी, सुल्तानी संकटांनी निफाड तालुक्यातील शेतकरी हतबल झाला असून, वनसगाव येथील शेतकरी त्र्यंबक कचरू शिंदे यांनी तीन एकर क्षेत्रावरील कोबीवर नांगर फिरविला आहे.
वनसगाव : गारपीट, अवकाळी अशा अस्मानी, सुल्तानी संकटांनी निफाड तालुक्यातील शेतकरी हतबल झाला असून, वनसगाव येथील शेतकरी त्र्यंबक कचरू शिंदे यांनी तीन एकर क्षेत्रावरील कोबीवर नांगर फिरविला आहे. शिंदे यांनी तीन एकर क्षेत्रावर कोबीची लागवड केली होती. विविध प्रकारची रासायनिक खते व जैविक घटक वापरून आपली शेती मोठ्या प्रमाणात फुलवली होती; मात्र पीक ज्यावेळी पूर्ण तयार होऊन बाजारामध्ये विकण्यासाठी नेले जाते, त्यावेळी कोबीला कुठल्याही प्रकारे बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नैराश्य येत आहे. मजुरी व औषधांचा खर्च फिटत नसल्यामुळे संतप्त शेतकरी शिंदे यांनी कोबीवर नांगर फिरविला.
कोबी बाजारात विकण्यासाठी नेली असता व्यापारी केवळ एक रु पया गड्डा अशा पद्धतीने मागणी करतात. तर कधी कधी बाजारात माल घेऊन गेल्यावर व्यापारी माल घेत नसे. कोबीच्या एका रोपाची किंमत साधारण ७० पैसे इतकी आहे. लागवडीसाठी लागणारा सुमारे पाच हजार रुपये इतका खर्च तर निंदणी, खुरपणीसह मजुरी वीस हजार इतकी होते, तर औषधाचा एक स्प्रे मारायचा तरी पाच ते सहा हजार रुपये इतका खर्च येतो. कृषी दुकानदाराकडे साधारण दोन लाख ८२ हजार इतकी उधारी झाली आहे. तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या कोबीला कवडीमोल भाव मिळत असल्याने तिच्यावर नांगर फिरविण्याचा निर्णय घेतला. - त्र्यंबक शिंदे, वनसगाव