प्राचीन गोंदेश्वर मंदिराला लाभणार झळाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:15 AM2021-03-10T04:15:36+5:302021-03-10T04:15:36+5:30
सिन्नर : अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात राज्यातील प्राचीन वैशिष्ट्यपूर्ण मंदिरांचा विकास करून हा मौल्यवान ठेवा जतन ...
सिन्नर : अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात राज्यातील प्राचीन वैशिष्ट्यपूर्ण मंदिरांचा विकास करून हा मौल्यवान ठेवा जतन करण्यासाठी १०१ कोटी रुपयांची घोषणा केली आहे. पहिल्या टप्प्यात स्थापत्यशैलीचा उत्कृष्ट नमुना असलेल्या सिन्नर येथील हेमाडपंथी गोंदेश्वर मंदिराचा त्यात समावेश करण्यात आला आहे. प्राचीन मंदिरांच्या विकास कार्यक्रमात ‘गोंदेश्वर’ मंदिराचा समावेश झाल्याने व त्याच्या विकासासाठी निधी मिळणार असल्याने भाविकांसह पर्यटकांनी समाधान व्यक्त केले आहे.
गोंदेश्वर येथील प्राचीन मंदिराला भारत सरकारने राज्यातील ‘राष्ट्रीय संरक्षित स्मारक’ म्हणून घोषित केलेले आहे. हे मंदिर पुरातन स्थापत्यशैलीच्या बांधकामाचा उत्तम नमुना आहे. १२ व्या शतकात गवळी राजकुमार राजगोविंद यांनी हे मंदिर बांधलेले आहे. हे मंदिर पाच मुख्य मंदिरांचा समूह असल्याने त्याला ‘शैवपंचायतन’ म्हटले जाते. यातील गोंदेश्वराचे मुख्य शिवमंदिर मध्यावर असून सभोवतीची चार उपदिशांना असणारी मंदिरे पार्वती, गणपती, सूर्य आणि विष्णू यांची आहेत. मंदिरात सभामंडप व गाभारा आहे. गर्भगृहात रेखीव शिवपिंड आहे. सभामंडपातील खांब नक्षीने कोरलेले असून त्यांवर आणि मंदिरांच्या भिंतींवर देवदेवता, गंधर्व-अप्सरा, पौराणिक आणि रामायणातील प्रसंग कोरलेले आहेत. मंदिरातील शिल्पकाम त्रिमिती असून, त्यावर पडणाऱ्या परावर्तित प्रकाशाच्या आणि सावलीच्या छटांतून मंदिराचे देखणेपण अधिकच उठावदार दिसते.
इन्फो
मंदिर परिसराचे सुशोभीकरण
मंदिराच्या परिसरात बगीचा विकसित करणे, लेझर लाईट लावणे, मंदिर संवर्धनाची कामे करणे प्रस्तावित आहे. तज्ज्ञ व्यक्तींच्या सल्ल्याने मंदिराचा परिसर सुशोभित करण्यात येणार आहे. त्यासाठी भरीव निधी मिळू शकेल, अशी अपेक्षा आमदार माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केली आहे.
फोटो- ०९ गोंदेश्वर टेम्पल
सिन्नरचे प्राचीन गोंदेश्वर मंदिर
===Photopath===
090321\09nsk_48_09032021_13.jpg
===Caption===
फोटो- ०९ गोंदेश्वर टेम्पल सिन्नरचे प्राचीन गोंदेश्वर मंदिर