मनोरु ग्णांवरील उपचारांना प्राचीन इतिहास
By Admin | Published: February 20, 2017 11:02 PM2017-02-20T23:02:57+5:302017-02-20T23:03:17+5:30
नाडकर्णी : काकासाहेब वाघ स्मृती व्याख्यान
नाशिक : भ्रमिष्टावस्था, अतिनैराश्य, उन्माद आदिंचे मनोरुग्ण विविध कारणांनी योग्य औषधोपचाराने त्यांची अवस्था निदान आटोक्यात राहू शकते. समाजात यातल्या काही जणांचे पुनर्वसनही करता येते. मनोविकारांवरचे उपचार यशस्वी होत असल्याची उदाहरणे अतिप्राचीन काळापासून दिसून येत असून, मनोरुग्ण इतरांप्रमाणेच सामान्य जीवन जगू शकतात, असे मत मानसशास्त्रीय आरोग्य संस्थेचे संचालक आनंद नाडकर्णी यांनी व्यक्त केले. शंकराचार्य संकुल येथील डॉ. कूर्तकोटी सभागृहात कर्मवीर काकासाहेब वाघ स्मृतिप्रीत्यर्थ के. के. वाघ वरिष्ठ महाविद्यालयातर्फे मन वढाय वढाय कार्यक्रमात ‘मानस शास्त्रातील रोमांचक प्रवास’ विषयावर आनंद नाडकर्णी यांनी मानसशास्त्राच्या प्राचीन इतिहासावर प्रकाशझोत टाकला. अध्यक्षस्थानी एस्पालियर द एक्सपेरिमेंटल स्कूलचे संचालक सचिन जोशी होते. यावेळी बोलताना नाडकर्णी यांनी शरीर आणि मन वेगळे नसून वैज्ञानिक दृष्टिकोनातून दोन्ही शरीराचा भाग असल्याचे सांगितले. ऐतिहासिक कालखंडात हिपोक्रॅटीस, मध्ययुगातील रेनिडेकोरटेस फ्रॉइड, पीनल आदि वैद्यकीय शास्त्रातील संशोधकांच्या अभ्यासातील निष्कर्ष उलगडून सांगताना नाडकर्णी यांनी मानस आरोग्य शास्त्राची आणि भौतिकशास्त्राच्या प्रगतीचे वर्णन केले. आजमितीला वैद्यकीय क्षेत्रात असलेल्या अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित उपकरणांच्या संशोधनांचा इतिहासही त्यांनी सांगितला. पहिल्या महायुद्धातील व दुसऱ्या महायुद्धाच्या प्रसंगांसह शीत युद्धाच्या कालखंडातील घटना व्हिएतनामच्या युद्धातील प्रसंग सांगून त्यांनी मानसिक आरोग्य शास्त्राच्या प्रगतीविषयी माहिती दिली. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. व्ही. एम. सेवलीकर यांनी केले, तर सूत्रसंचालन अनघा काण्णव यांनी केले. आदिती गिजरे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)