गंगापूर धरणातील प्राचीन मूर्ती ‘जैसे थे’
By Admin | Published: April 17, 2016 11:18 PM2016-04-17T23:18:20+5:302016-04-17T23:45:27+5:30
अनेक वेळा पुरानंतरही मूर्ती जागेवरच
!नाशिक : दुष्काळी स्थितीमुळे गंगापूर धरणात सध्या अत्यल्प जलसाठा असून याठिकाणी खडकाळ भाग व जमीन उघडी पडली आहे. विशेष म्हणजे धरणाच्या उभारणी काळात सापडलेल्या प्राचीन मूर्ती अनेक वेळा आलेल्या पुरानंतरही ‘जैसे थे’ अवस्थेत आहेत.
या मूर्ती येथे असल्याने धरणाला काहीही धोका नाही अशी भावना या परिसरातील नागरिकांची आहे. गंगापूर धरणाच्या उभारणीच्या काळात सुमारे ५० वर्षांपूर्वी याठिकाणी खोदकाम करताना मजूरांना येथे प्राचीन काळातील विष्णूच्या वराह अवतारातील हत्तीवर आरूढ मूर्ती सापडली होती.
त्याचप्रमाणे शंकराची पिंड आणि नंदी या मूर्तींची तसेच अन्य ग्राम देव-देवतांच्या या मूर्तींची धरणाच्या दरवाज्यानजीक कामगारांकडून स्थापना करण्यात आली होती. कालांतराने धरणात पाणीसाठा वाढल्याने मूर्ती पाण्याखाली गेल्या. त्यानंतर २० वर्षांपूर्वी दुष्काळात धरण कोरडे पडले असता सदर मूर्ती तेथेच होत्या. त्याचप्रमाणे येथे श्रीगणेशाची अडीच फुटाची मूर्तीदेखील आढळली. सदर मूर्ती कोठून आली. याबाबत कोणालाच माहिती नव्हती.
येथील कामगारांनी श्रीगणेशाची मूर्ती जलसाठा मापक स्तंभावर ठेवली. पुढील काळात अनेकदा धरण १०० टक्के भरले. आठ वर्षांपूर्वी महापूर आला तरीही श्रीगणेशाची मूर्ती तसेच अन्य पुरातन मूर्ती ज्या ठिकाणी ठेवलेल्या होत्या तेथेच आहेत. यंदा धरण कोरडे पडल्याने पुन्हा या सर्व मूर्तींचे दर्शन झाले असून स्थानिक कारागिरांनी मूर्तीला रंगरंगोटी करण्याचे काम सुरू केले आहे. (प्रतिनिधी)