...अन् तरुणाला मिळाली पाच वर्षांनंतर दृष्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2018 11:55 AM2018-08-09T11:55:56+5:302018-08-09T11:56:30+5:30
शेतमजूर महेंद्र ठाकरे या तरुणाची दुर्मीळ अशा पॅन युनिआयटिस आजाराने दोन्ही डोळ्यांची दृष्टी गेली होती
नाशिक : दुर्मीळ अशा पॅन युनिआयटिस आजाराने त्रस्त असणाऱ्या आदिवासी तरुणाच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया केल्यानंतर पाच वर्षांनंतर त्याला दृष्टी प्राप्त झाली असून, त्याच्या जीवनात आता लख्ख प्रकाश पडला आहे.
शहरातील नेत्रतज्ज्ञ डॉ. कल्याण चोथे यांनी ही शस्त्रक्रिया मोफत केली आहे. पाच वर्षांपासून धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील विटाई गावातील आदिवासी शेतमजूर महेंद्र ठाकरे या तरुणाची दुर्मीळ अशा पॅन युनिआयटिस आजाराने दोन्ही डोळ्यांची दृष्टी गेली होती. दृष्टीअभावी त्यांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन ते पाच वर्षांपासून घरीच बसून होते. साक्री येथील कार्यकर्ते भरत जोशी यांनी ठाकरे यांना चोथे डॉक्टरांकडे तपासणीस आणले. तपासणीनंतर ठाकरे यांचा एक डोळा पूर्णपणे निकामी झाला असून, प्रयत्न केल्यास दुसºया डोळ्यावरील शस्त्रक्रियेनंतर त्यास दृष्टी येऊ शकते असा विश्वास दिला; परंतु रुग्णाची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने त्याला कुठलाच खर्च पेलणे शक्य नसल्याचे समोर येताच शस्त्रक्रिया मोफत करण्याचा निर्णय घेण्यात आला. औषधोपचार व प्रवास खर्चाची जबाबदारी भरत जोशी यांनी पार पाडली. अवघड व गुंतागुंतीची शस्त्रक्रिया दोन तासांत पार पडली व डोळ्यावरील पट्टी उघडल्यानंतर ठाकरे यांची दृष्टी परत आली. दृष्टी परत येताच ठाकरे कुटुंबीयांच्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघळू लागले. शस्त्रक्रियेमुळे पाच वर्षांनंतर ते प्रथमच कुटुंबीयांना बघू शकत होते.