...अन् गावकऱ्यांचे डोळे पाणावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 12:50 AM2018-06-24T00:50:59+5:302018-06-24T00:51:14+5:30
बागलाण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील आदर्श गाव किकवारीचे प्रणेते व लोकमत सरपंच पुरस्काराचे यंदाचे मानकरी केदा काकुळते यांच्या पत्नी धनूबाई केदा काकुळते यांचा तसेच गावातील आजी, मुलगी व नातीचा अपघातात मृत्यू झाल्यामुळे संपूर्ण पंचक्र ोशीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
तळवाडे दिगर : बागलाण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील आदर्श गाव किकवारीचे प्रणेते व लोकमत सरपंच पुरस्काराचे यंदाचे मानकरी केदा काकुळते यांच्या पत्नी धनूबाई केदा काकुळते यांचा तसेच गावातील आजी, मुलगी व नातीचा अपघातात मृत्यू झाल्यामुळे संपूर्ण पंचक्र ोशीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. गावात एकाच वेळी चार अंत्ययात्रा निघाल्यामुळे संपूर्ण गावासह उपस्थितांचे डोळे पाणावले. सायंकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान चारही मृतदेहांवर सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले. किकवारी खुर्द येथील कैलास महादू जगताप यांच्या मुलीच्या विवाहासाठी नाशिक येथे जात असताना शिरवाडे वणी जवळ क्रुझरचे वाहनाचे टायर फुटून अपघात झाला. या अपघातात किकवारी खुर्द येथील आदर्श गावाचे प्रणेते केदा काकुळते यांच्या पत्नी धनूबाई केदा काकुळते (६०), सरस्वतीबाई नथू जगताप (५५), कृष्णाबाई बाळासाहेब शिंदे (६२), तेजेश्री साहेबराव शिंदे (१८), तर मुजवाड येथील शोभा संतोष पगारे (३८), उर्वशी विनायक मोरे (१२), डांगसौंदाणे येथील रत्ना राजेंद्र गांगुर्डे (४०) आणि कळवण येथील चालक अशोक पोपट गांगुर्डे (५७) यांचा मृत्यू झाला. अपघाताचे वृत्त कळताच किकवारी गावावर शोककळा पसरली. एकूण आठ जणांच्या मृत्यूमुळे बागलाण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यासाठी आजचा शनिवार काळा शनिवार ठरला. मुंबई-आग्रा महामार्गावर शिरवाडे वणी जवळ सकाळी ११ वाजेदरम्यान क्रुझरचे टायर फुटल्याने अपघात होऊन बागलाण तालुक्यातील किकवारी खुर्द, मुंजवाड, डांगसौंदाणे व कळवण येथील आठ जणांचा मृत्यू झाला. सायंकाळी मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी तालुक्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक विविध क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते.
हलाखीच्या परिस्थितीत उभा केला संसार
डांगसौदाणे : शिरवाडे वणी जवळील अपघातात येथील एका गरीब शेतकरी कुटुंबातील महिला रत्नाबाई राजेंद्र गांगुर्डे यांच्या मृत्यूची बातमी गावात येऊन धडकताच गावात सर्वत्र शोककळा पसरली. गावातील व्यापारी वर्गाने आपापली दुकाने बंद करून राजेंद्र गांगुर्डे यांच्या घराकडे धाव घेतली. पती राजेंद्र गांगुर्डे यांच्या खांद्याला खांदा लावून रत्नाबाई गांगुर्डे यांनी अतिशय हलाखीच्या परिस्थितीत कष्टाने संसाराचा गाडा ओढून आपल्या दोन मुलींचे थाटामाटात लग्न लावून दिले. हलाखीच्या परिस्थितीमध्येही आपल्या दोघां मुलांचे उच्चशिक्षण त्या पूर्ण करीत होत्या. हलाखीच्या परिस्थितीत अतोनात कष्ट घेऊन आपल्या संसाराचा गाडा ओढून संसाराचे नंदनवन फुलविणाºया रत्नाबाई गांगुर्डे यांच्या घरी ग्रामस्थांनी मोठी गर्दी करून पती व मुलांना धीर दिला. रत्नाबाई गांगुर्डे यांच्यावर येथील आरम नदीतीरी सांयकाळी ५ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात पती, दोन मुली, दोन मुले, सासू, सासरे असा परिवार आहे.