...अन् पोलिसांनी हरिहर गडावर फडकावला भगवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2020 05:47 PM2020-01-07T17:47:24+5:302020-01-07T17:48:19+5:30
ग्रामीण पोलिसांची चढाई : ताण कमी करण्यासाठी ट्रेकींगचा उपक्रम
त्र्यंबकेश्वर : पोलिसांवरील ताण कमी व्हावा आणि त्यांच्यात आपसात मैत्रीभाव अधिक वृद्धिंगत व्हावा, या उद्देशाने ग्रामीण पोलीस अधिक्षक आरती सिंह यांच्या नेतृत्वाखाली पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांनी जिल्ह्यातील किल्ल्यांपैकी अतिदुर्गम व चढण्या-उतरण्यास कठीण अशा हरिहर गडावर चढाई केली. यावेळी पथकाने छत्रपती शिवरायांचा जयजयकार करत गडाच्या शिखरावर भगवा फडकाविला.
दैनंदिन कामातून काही क्षण बाजूला काढत पोलिसांच्या मनावरील ताण हलका व्हावा, त्यांच्यात मैत्रीभाव दृढ होऊन पोलिस आणि जनता यांच्यात मैत्रीचे नाते तयार व्हावे याकरीता ग्रामीण पोलीस अधिक्षक आरती सिंह यांनी जिल्ह्यातील अवघड अशा हरिहर गडावर ट्रेकींगची मोहीम राबविण्याचा निर्धार केला. त्यानुसार, काही पोलिस अधिकारी व कर्मचारी यांची टीम करत त्यांनी नुकतीच हरिहर गडाची यशस्वी चढाई केली. हरिहर किंवा हर्ष गड ट्रेकींगच्या या मोहिमेत नाशिक ग्रामीणच्या पोलीस अधिक्षक श्रीमती आरती सिंह, अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती शर्मिष्ठा वालावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी भिमाशंकर ढोले, उपविभागीय पोलीस अधिकारी अरु ंधती राणे, माधव पडिले, सदाशिव वाघमारे, स्थानिक गुन्हे शाखेचे के.के.पाटील, घोटीचे सपोनि जालींदर पळे, त्र्यंबकेश्वरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे तसेच हवालदार राजु दिवटे, मेघराज जाधव आदी कर्मचारी सहभागी झाले होते.