...अन त्या जखमीचे वाचले प्राण,डॉक्टर आणि पोलिसांनी घडविले माणूसकीचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 06:38 PM2017-12-27T18:38:10+5:302017-12-27T18:51:49+5:30
प्राथमिक उपचार किट काढून रक्तबंबाळ झालेल्या एका जखमीला मांडीवर घेऊन कृत्रिम श्वासोश्वास यंत्राने प्राणवायू दिला
नाशिक : वेळ रात्री पावणे अकरा वाजता... ठिकाण मुंबई आग्रा महामार्गावरील अमृतधाम चौफली परिसर...पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनेश बर्डेकर हे पोलिस कर्मचाºयांसह अमृतधाम परिसरात गस्त घालत असताना चौफलीजवळ दोन दुचाकी वाहने समोरासमोर धडकली. दोन्ही दुचाकीवरील तीन ते चार जण रस्त्यावर पडले. त्याच दरम्यान रस्त्याने जाणाºया डॉक्टरांनी तत्परता दाखवित आपल्याकडे असलेले प्राथमिक उपचार किट काढून रक्तबंबाळ झालेल्या एका जखमीला मांडीवर घेऊन कृत्रिम श्वासोश्वास यंत्राने प्राणवायू दिला. तब्बल पंधरा ते वीस मिनिटांनी रूग्णवाहिका दाखल झाल्यानंतर त्या जखमींना पंचवटी पोलिसांनी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करून अपघातातील जखमींना तत्काळ मदत करून माणूसकीचे दर्शन घडविले.
ऐरवी अपघात म्हटला तर रस्त्याने जाणारे नागरीक अपघातात जखमी झालेल्यांना मदत करण्यापेक्षा त्या जखमींचे मोबाईल मध्ये फोटोसेशन करून व चित्रण करून त्या क्लिप, फोटो सोशल मिडीयावर पोस्ट करण्यात धन्यता मानतात. मात्र जणू देवदूताच्या रूपात आलेल्या पोलीस व डॉक्टर यांनी जखमींचे प्राण वाचवून मनुष्याचा जीव किती महत्वाचा आहे हे पटवून दिले.
हिरावाडीतील अयोध्यानगरीतील युवक आई वडीलांना घेण्यासाठी दुचाकीवरून अमृतधाम चौफुलीवर येत असतांनाच समोरासमोर दोन दुचाकींची धडक होऊन अपघात झाला. त्याच दरम्यान पोलीस गस्तीवर असलेल्या पोलिसांना अपघात झाल्याचे लक्षात येताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक बर्डेकर यांनी धाव घेत पोलिस कर्मचाºयांच्या मदतीने रस्त्यावर पडलेल्या जखमींना रूग्णालयात हलविले. त्यातील एक जखमी रक्तबंबाळ अवस्थेत पडलेला होता. रूग्णवाहिकेला माहिती कळविली आणि योगायोग म्हणा त्याच रस्त्याने कळवण येथिल डॉक्टर सुहास कोटकर हे चारचाकीतून जात होते. अपघात झाल्याने विव्हळणाºया जखमीस पाहून त्यांनी तत्काळ चारचाकी थांबविली. आपल्याजवळ असलेल्या कृत्रिम श्वासोश्वास यंत्राने त्या जखमीवर उपचार सुरू केले. तब्बल पंधरा ते वीस मिनिटे उपचार सुरू होते. अखेर रूग्णवाहिका दाखल झाल्यानंतर त्यास उपचारासाठी रूग्णालयात हलविले. डॉक्टरांनी वेळीच उपचार नसता केला तर रक्त फुप्फुसात जाऊन तो रूग्ण दगावण्याची शक्यता होती.