..अन् वाट चुकलेला छकुला आईच्या कुशीत !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 11:14 PM2020-03-19T23:14:25+5:302020-03-20T00:05:16+5:30
आई तुझं लेकरु... येडं गं कोकरु...’, ‘माझा छकुला... माझा सोनुला...’ या गाण्याच्या ओळी आठवल्या की उभा राहतो तो वाट चुकलेल्या चिमुकल्याच्या कथेचा सिनेमा. अनेक कसरती आणि प्राणपणाला लावून शोध घेतल्यानंतर आपल्या छकुल्याला पाहताच आईच्या डोळ्यातीन आनंदाश्रु तरळतात अन् सुखदायी शेवट सिनेमात पहायला मिळतो. मात्र, असाच प्रसंग खऱ्या आयुष्यात अनुभवला तो मालेगाव तालुक्यातील एका मातेने...
पिंपळगाव बसवंत : ’आई तुझं लेकरु... येडं गं कोकरु...’, ‘माझा छकुला... माझा सोनुला...’ या गाण्याच्या ओळी आठवल्या की उभा राहतो तो वाट चुकलेल्या चिमुकल्याच्या कथेचा सिनेमा. अनेक कसरती आणि प्राणपणाला लावून शोध घेतल्यानंतर आपल्या छकुल्याला पाहताच आईच्या डोळ्यातीन आनंदाश्रु तरळतात अन् सुखदायी शेवट सिनेमात पहायला मिळतो. मात्र, असाच प्रसंग खऱ्या आयुष्यात अनुभवला तो मालेगाव तालुक्यातील एका मातेने...
त्याचे झाले असे की, मालेगाव तालुक्यातील वडेल येथील पूनम सगट या त्यांच्या दिंडोरी तालुक्यातील खेडगाव येथे वास्तव्यास असलेल्या भावाकडे आल्या होत्या. त्यांचा महेश नावाचा सात वर्षाचा मुलगाही मामाच्या भेटीसाठी आला होता. मात्र, मामाच्या घराजवळ खेळताखेळता महेश चुकून रस्त्यावर आला. त्यास काहीही उमजेना, कुणाच्यातरी वाहनावर बसून तो पिंपळवाव येथे पोहचला. पिंपळगाव येथील वणी चौफुली परिसरात तो नागरिकांना रडत असल्याचे आढळले. पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली. अखेर सोशल मीडियाच्या सहाय्याने पारखं झालेलं लेकरु कुशीत येताच मातेच्या डोळ्यात आनंदाश्रु तरळले. ते दृष्य पाहुन उपस्थितांच्या डोळ्यांच्या कडा आपसूकच ओलावल्या. पोलीस कर्मचारी तुषार झाल्टे, रवी बाराहाते, अनंत पाटील व पानसरे आदी यांचे पूनम सगट व कुटुंबीयांनी आभार मानले. यावेळी लक्ष्मण भवर, रूपेश गांगुर्डे, सचिन नीरभवने, नीलेश मौले आदी उपस्थित होते.
सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर जोगारे यांनी पोलीस निरीक्षक संजय महाजन यांच्या मदतीने सोशल मीडियाद्वारे बेपत्ता मुलगा सापडला असून, त्याच्या शोधात कुणी असेल तर त्यांनी पिंपळगाव पोलिसांशी संपर्काचे आवाहन केले. मुलाने दिलेल्या तोडक्यामोडक्या माहितीच्या आधाराने तो मालेगाव परिसरातील असल्याचे समजले. मालेगाव येथील लोकमतचे प्रतिनिधी अतुल शेवाळे यांनी सोशल मीडियावरुन ही माहिती परिसरात व्हायरल केली. ही वार्ता वडेल येथेही पोहोचली. पोलीसपाटील व शेवाळे यांच्यात संवाद झाल्यानंतर तो मुलगा त्याच्या आईसह खेडगाव येथे गेला असल्याचे समजले. यानंतर पिंपळगाव पोलिसांनी मुलासह खेडगाव गाठत त्याची आई व मामा यांचा शोध घेत महेशला त्यांच्या स्वाधीन केले.