अंगणवाडी सेविकांचा पंचायत समितीसमोर ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 05:32 PM2019-02-16T17:32:42+5:302019-02-16T17:32:50+5:30
सटाणा : विविध मागण्यांसाठी आंदोलन
सटाणा : बागलाण तालुक्यातील अंगणवाडी सेविकांना अमृतआहार योजनेचे थकीत पैसे त्वरित मिळावेत तसेच मोदी सरकारने गेल्या वर्षी सेविकांना १५०० रु पये आणि मदतनीस यांना ७५० रु पये देण्यात येतील, अशी घोषणा केली होती. त्याची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी बागलाण तालुक्यातील अंगणवाडी सेविकांनी पंचायत समिती येथे ठिय्या आंदोलन छेडले.
संघटनेचे राज्य सचिव राजेश सिंग व भगवान दौणे, तालुकाध्यक्ष रजनी कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी (दि.१६) पंचायत समिती कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन करण्यात आले. अमृतआहार योजनेचे थकीत पैसे मिळत नाही तो पर्यंत अंगणवाडी मध्ये अमृतआहारचे काम न करण्याचा निर्धार अंगणवाडी सेविकांनी केला. यावेळी सचिव राजेश सिंग यांनी संगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या आॅक्टोबर मध्ये अंगणवाडी सेविकांच्या मानधनात दुपटीने वाढ केली होती. ही मानधन वाढ नोव्हेंबरमध्ये मिळणे अपेक्षित होते. मात्र राज्य सरकारने अद्यापही अंगणवाडी सेविकांना मानधन वाढवून दिलेले नाही. केंद्राचे आदेश असतानाही राज्य सरकार याची अंमलबजावणी करत नाही. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने अंगणवाडी सेविकांची दिशाभूल त्वरित थांबवावी, आॅक्टोबर २०१७ पासून एप्रिल २०१८ पर्यंत देण्यात आलेल्या मानधनवाढीच्या फरकाची रक्कम देण्यात यावी. नोव्हेंबर २०१७ पासून जानेवारी २०१९ पर्यंत अमृत आहार योजनेसाठी खर्च झालेले पैसे त्वरित देण्यात यावे. बचतगटांचे थकीत पैसे देण्यात यावे. सेवा समाप्त करण्यात आलेल्या अंगणवाडी कर्मचाना सेवा समाप्तीचा लाभ देण्यात यावा, आदी मागण्या असल्याचे सांगण्यात आले.
ठाणे ते मंत्रालय मशाल मोर्चा
गेल्या १५ महिन्यांपासून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अमृत आहार योजनेचे पैसे दिले गेले नाहीत. अमृत आहार योजनेचे मिळत नाही तोपर्यंत बागलाण तालुक्यात योजनेचा आहार शिजवणार नाही, असेही राजेश सिंग यांनी संगितले. अंगणवाडी कर्मचा-यांचे प्रश्न व विविध मागण्यांसाठी दि. २५ फेब्रुवारी रोजी ठाणे ते मंत्रालयपर्यंत मशाल मोर्चा काढण्यात येणार असल्याचेही राजेश सिंग यांनी संगितले.