गुणांकनाच्या आधारे होणार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:14 AM2021-07-29T04:14:47+5:302021-07-29T04:14:47+5:30
सिन्नर पंचायत समितीच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प एक व दोनअंतर्गत अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस व मिनी अंगणवाडी ...
सिन्नर पंचायत समितीच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प एक व दोनअंतर्गत अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका अशा २६ जागांसाठी १५७ महिला उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. शासन निर्णयानुसार इच्छुकांनी अर्जासोबत सादर केलेली शैक्षणिक कागदपत्रे व गुणवत्तेच्याआधारे सर्वाधिक गुण धारण करणाऱ्या उमेदवारांना मुलाखतींना फाटा देऊन थेट नियुक्तीचे आदेश देण्यात येतील, अशी माहिती एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी जी. एम. शेवाळे, एम. एस. भोये यांनी दिली.
सिन्नर तालुक्यात दोन्ही प्रकल्पांतर्गत अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या जवळपास ६८ जागा अद्यापही रिक्त आहेत. तथापि, शासनाने २०१९ पर्यंतच्या रिक्त जागा भरण्यास परवानगी दिल्याने ही भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या प्रकल्प एकअंतर्गत अंगणवाडी सेविका ९ व मिनी अंगणवाडी सेविका १ अशा दहा जागांसाठी, तर प्रकल्प दोनअंतर्गत अंगणवाडी सेविका ८, मदतनीस ५ व मिनी अंगणवाडी सेविका ३ अशा १६ जागा भरण्यात येत आहेत.
प्राप्त अर्जांची तपासणी करून गुणांकन करण्यात आले आहे. तथापि, दुसऱ्या तालुक्यातील एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी तालुक्यात येऊन प्राप्त अर्जांची तपासणी करणार आहेत. त्यानंतर यादी संबंधित ग्रामपंचायतींच्या नोटीस बोर्डवर दि. ४ ऑगस्टपर्यंत प्रसिध्द करण्यात येणार आहे. दि. ५ व ६ ऑगस्ट हरकतींसाठी राखीव ठेवण्यात आलेले आहेत. हरकती असल्यास संबंधितांना लेखी स्वरूपात एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयात सादर कराव्या लागतील. हरकतींचे निवारण झाल्यानंतर सर्वाधिक गुण धारण करणाऱ्या उमेदवारांना थेट नियुक्तीचे आदेश देण्यात येतील.
इन्फो
पारदर्शी प्रक्रिया
ही भरती प्रक्रिया पारदर्शीपणे राबविण्यासाठी शासनाने विशिष्ट पध्दतीचा अवलंब करण्याचे आदेश दिलेले असून त्यात अंगणवाडी सेविकांसाठी दहावी, बारावी व त्यापुढील शैक्षणिक पात्रता, मिळालेली टक्केवारी यानुसार शंभरपैकी गुणांकन केलेले असून, मदतनीस या पदासाठी उमेदवार दहावी, बारावी उत्तीर्ण असला तरी, सातवी उत्तीर्ण व मिळालेली टक्केवारी यावर लक्ष केंद्रित करण्यात आलेले आहे. त्यामुळे ज्या उमेदवाराला सर्वाधिक गुण मिळतील, त्यांना गुणवत्तेच्या जोरावर नियुक्ती मिळणार आहे.