साहेब, आमच्या मागण्या मान्य करा! मुख्यमंत्र्यांच्या पाया पडत अंगणवाडी ताईने फोडला टाहो
By धनंजय रिसोडकर | Published: January 9, 2024 01:32 PM2024-01-09T13:32:12+5:302024-01-09T13:32:29+5:30
मुख्यमंत्र्यांनी अंगणवाडी ताईंच्या मानधनात वाढ केली की नाही? अशी विचारणा केली.
नाशिक : नाशिकच्या पाहणी दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तपोवनातील साधुग्राममध्ये आले असताना एका अंगणवाडी कर्मचाऱ्याने थेट मुख्यमंत्र्यांच्या पायाला हात लावत अचानकपणे ‘साहेब आमच्या मागण्या मान्य करा’ असा टाहो फोडला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी अंगणवाडी ताईंच्या मानधनात वाढ केली की नाही? अशी विचारणा केली. तसेच सभास्थानी उभारलेल्या तंबूत महिलेशी चर्चा करून त्यांची समजूत घालत या प्रकरणात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले.
नाशिकला होणाऱ्या युवा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा १२ जानेवारीला नाशिक दौरा नियोजित असल्याने त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे हे सर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी नाशिकला आले होते. मुख्यमंत्री शिंदे हे साधुग्रामवरील मोदी यांच्या सभास्थानाच्या तयारीची पाहणी करण्यासह आढावा बैठकीसाठी गाडीतून खाली उतरता क्षणीच ही घटना घडून आली.
वीसहून अधिक अंगणवाडी कर्मचारी महिला हातात मागण्यांचे फलक घेऊन साधुग्राममध्ये दुपारपासूनच उभ्या होत्या. त्यातील दोन महिलांना मुख्यमंत्र्यांना भेटून निवेदन देण्याची परवानगी पोलिसांकडून त्यांना देण्यात आली होती. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह पालकमंत्री दादा भुसे हे गाडीतून उतरून सभास्थानी दाखल होताच, त्यातील राणी सोमनाथ मुर्तडक यांनी रडून, ओरडून मागण्यांसाठी टाहो फोडल्याने त्या जागेवर दोन मिनिटे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. मुख्यमंत्री आणि पाालकमंत्र्यांनी जागेवरच महिलेची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, महिलेने रडणे सुरूच ठेवल्याने तेथील तंबूत नेऊन महिलेची समजूत घालण्यात आली.