अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा इंग्रजी पोषण ट्रॅकर ॲपवर बहिष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 03:27 PM2021-06-19T15:27:00+5:302021-06-19T15:27:12+5:30
लासलगाव : जिल्ह्यासह राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मराठी ॲप येईपर्यंत इंग्रजी पोषण ट्रॅकर ॲपवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे अशा आशयाचे निवेदन एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे प्रकल्प अधिकारी यांना निफाड तालुक्यातील अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत नाशिक जिल्ह्यात सुमारे ४००० अंगणवाडी सेविका कार्यरत आहेत. अंगणवाडी केंद्रातील दैनंदिन कामाकरिता अंगणवाडी सेविकांना शासनाकडून मोबाइल देण्यात आले आहेत. हे मोबाइल निष्कृष्ट दर्जाचे असल्याने शासनाने दिलेल्या मोबाइलमध्ये पोषण ट्रॅकर ॲप डाऊनलोड होत नाही. त्यामुळे जिल्हा व प्रकल्प कार्यालयाकडून अंगणवाडी सेविकांना व्यक्तिगत मोबाइलवर पोषण ट्रॅकर ॲप डाऊनलोड करण्याची सक्ती केली जाते. बहुतेक अंगणवाडी सेविका या मराठी भाषेतून शिक्षण घेतल्या कारणाने त्यांना इंग्रजी भाषेचे ज्ञान नसल्यामुळे अडचण निर्माण होत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. निवेदन देतेवेळी निफाड तालुक्यातील युनियन प्रतिनिधी लता क्षीरसागर, संगीता कासार, जया गरडे उपस्थित होते.