अंगणवाडीसेविका ‘नॉट रिचेबल’; ऑफलाइन अहवालाचा वाढला ताण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:16 AM2021-09-14T04:16:46+5:302021-09-14T04:16:46+5:30
अंगणवाडी सेविकांना त्यांच्याकडील माहिती ऑनलाइन भरण्यासाठी २०१९ मध्ये शासनाने पॅनासोनिक कंपनीचे मोबाइल दिले होते. सध्या ही कंपनी बंद पडली ...
अंगणवाडी सेविकांना त्यांच्याकडील माहिती ऑनलाइन भरण्यासाठी २०१९ मध्ये शासनाने पॅनासोनिक कंपनीचे मोबाइल दिले होते. सध्या ही कंपनी बंद पडली असून, कंपनीच्या मोबाइलचे पार्टदेखील मिळत नाहीत. त्यातच मोबाइलचा दर्जा अतिशय हलका असल्याने त्याची गॅरंटी व वॉरंटी गेल्या वर्षीच संपुष्टात आलेली आहे. असे असतानाही शासनाकडून पोषण ट्रॅक ॲपवर माहिती भरण्याचा आग्रह अंगणवाडी सेविकाकडे धरला जात आहे. सध्याच्या मोबाइलमध्ये सदरचे ॲप्लिकेशन डाऊनलोड होत नाही.
---
कामाचा वाढला व्याप
एकीकडे नादुरुस्त मोबाइल व दुसरीकडे शासनाकडून दररोज ऑनलाइन माहिती भरण्याची सक्ती केली जात अंगणवाडी सेविकांच्या कामाचा ताण वाढला आहे. अंगणवाडी सेविकांनी मोबाइल जमा केल्यामुळे शासनाकडे दररोज भरली जाणारी ऑनलाइन माहिती भरणेही बंद झाल्याने ऑफलाइन माहिती भरावी लागत आहे.
-------------
म्हणून केला मोबाइल परत
१ - शासनाने मोफत दिलेला मोबाइल कंपनी आता बंद पडली असून, या कंपनीचे स्पेअर पार्टदेखील मिळेनासे झाले आहेत.
२- सदर मोबाइल रॅमची क्षमता कमी असून, शासनाने दिलेले ॲप डाऊनलोड होत नाही. त्यामुळे मोबाइल हँग होतात.
३- मोबाइल ॲपची माहिती इंग्रजीत असून, बऱ्याचशा अंगणवाडी सेविकांना त्याचे ज्ञान नाही.
-------
जिल्ह्यातील एकूण अंगणवाड्या ४७७६
अंगणवाडी सेविका-४२८८
४००० जणींनी केला मोबाइल परत
---------
‘असून अडचण, नसून खोळंबा’
शासनाने दिलेल्या मोबाइलची मुदत संपुष्टात आली आहे. अतिशय साध्या पद्धतीचे असलेले मोबाइलची क्षमता कमी होती. त्यामुळे माहिती भरणे व ती साठवून ठेवण्यात अडचणी निर्माण होत आहे. त्यामुळे सेविकांना स्वत:ची पदरमोड करून त्याची दुरुस्ती करावी लागत असे.
- आशा गांगुर्डे, अंगणवाडी सेविका
--------------
मोबाइल ॲपवर माहिती भरण्यास अनेकांनी अडचणी येत, रेंजचा प्रश्न, ग्रामीण भागात वीजपुरवठा खंडित होत असल्याने चार्जिंग करणे अवघड होते. त्यामुळे मोबाइल हाताळणे जिकिरीचे झाले आहे. शासनाने सर्व अडचणींचा विचार करूनच त्याची अंमलबजावणी करावी.
- कोमल भोये
-----------
अंगणवाडी सेविकांनी मोबाइल जमा केले असले तरी, त्यांचे दैनंदिन कामकाज सुरूच आहे. मोबाइलवर भरली जाणारी माहिती त्यांच्याकडून रजिस्टरवर भरली जात आहे. त्यामुळे कामकाजावर फारसा परिणाम झाला नाही.
- दीपक चाटे, महिला व बालकल्याण अधिकारी