ऐन संकटकाळात 'देवदूत' धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:16 AM2021-04-28T04:16:47+5:302021-04-28T04:16:47+5:30
----- नाशिक : शहरात सध्या कोरोनाने हाहाकार उडविला असून, सर्वसामान्यांना केवळ डॉक्टर ही एकमेव व्यक्ती आजच्या या संकटकाळी 'देवदूत' ...
-----
नाशिक : शहरात सध्या कोरोनाने हाहाकार उडविला असून, सर्वसामान्यांना केवळ डॉक्टर ही एकमेव व्यक्ती आजच्या या संकटकाळी 'देवदूत' वाटत आहे; मात्र असे असतानाही अचानकपणे शहरात डॉक्टरांसह पोलिसांवरही हल्ले होण्याच्या घटना मागील सोमवारी घडल्याने संताप व्यक्त होत आहे.
शहरात सर्वत्र कोरोनाने थैमान घातले असून, कोरोनाबाधितांचा जीव वाचविण्यासाठी शहरातील सरकारी व खासगी रुग्णालयांमध्ये डॉक्टर, परिचारिका, सिस्टर, वॉर्डबॉय, रुग्णवाहिका चालक हे सर्व घटक अहोरात्र झटत आहेत, तर दुसरीकडे कोरोनाची साखळी तुटावी यासाठी कडक निर्बंधांच्या चोख अंमलबजावणीकरिता शहरातील विविध चौकाचौकांमध्ये दिवस-रात्र कडा पहारा पोलिसांकडून दिला जात आहे. डॉक्टर पोलीस कोरोनाच्या संकटकाळात योद्ध्यांची भूमिका बजावत आहेत. समाजाच्या सुरक्षिततेसाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून हे योद्धे लढा देत आहेत, तर दुसरीकडे मात्र अचानकपणे शहरात सोमवारी घडलेल्या डॉक्टर व पोलिसांवरील हल्ल्याच्या विविध घटनांनी एकप्रकारे या योद्ध्यांचे मनोबल कमी करण्याचे काम केल्याचे बोलले जात आहे.
शहरातील सातपूर, इंदिरानगर, मुंबईनाका या पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या डॉक्टरांना मारहाणीच्या घटना व रुग्णालयाच्या तोडफोडमुळे संताप व्यक्त होत आहे. पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाकाबंदीच्या ठिकाणी कर्तव्य बजावणाऱ्या एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला संशयित तरुण-तरुणीने दिलेली वागणूकही चीड निर्माण करणारी आहे. पोलिसांनी या तिन्ही घटनांची गंभीरपणे दखल घेत संशयितांविरुद्ध गुन्हाही दाखल केला आहे. महिला पोलिसाला धक्काबुक्की करणाऱ्या संशयित युवकास अटकही करण्यात आली आहे. उर्वरित घटनांमध्ये सीसीटीव्ही फुटेज तपासून त्याआधारे संशयितांचा माग पोलिसांकडून काढला जात आहे.