शुल्क आकारणीवरून गणेशोत्सव मंडळांमध्ये महापालिकेविरोधात रोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:20 AM2021-09-08T04:20:25+5:302021-09-08T04:20:25+5:30
नाशिक : नाशिक महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणतीही वर्गणी गोळा न करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
नाशिक : नाशिक महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणतीही वर्गणी गोळा न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गणेशोत्सव मंडळाच्या आर्थिक गणितावरही त्याचा परिणाम होणार आहे. त्यासाठी नाशिक गणेशोत्सव महामंडळाच्या माध्यमातून मंडप शुल्क व जाहिरात कर माफ करण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु, ही मागणी महापालिका प्रशासनाने नाकारल्याने गणेशोत्सव मंडळांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. त्याचप्रमाणे अद्याप गणेशोत्सव मंडळांना महापालिकेकडून परवानगीही मिळालेली नसल्याने गणेशोत्सव अवघ्या तीन ते चार दिवसांवर येऊन ठेपला असताना मंडळांना उत्सवाची तयारी करण्यातही अडचणींचा सामना करावा लागत असल्याने मंडळांमध्ये महापालिका प्रशासनाविरोधात तीव्र रोष व्यक्त होत आहे.
--
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव मंडळांना यावर्षी देणगीतून मिळणारा निधी मिळणार नाही, त्यामुळे महापालिकेने नवी मुंबईच्या धर्तीवर गणेशोत्सव मंडळांचा कर माफ करावा, अशी मंडळाची मागणी आहे. परंतु, महापालिकेने मंडळांचा प्रस्ताव मान्य केला नाही. त्यामुळे मंडळांमध्ये नाराजी आहे.
-सत्यम खंडाळे, संस्थापक, मानाचा राजा गणपती मंडळ
--
महापालिका प्रशासनाने मागील वर्षीही करमाफीचे आश्वासन दिले होते. परंतु, प्रत्यक्षात कोणतीही करमाफी दिली नाही. यावेळीही तीच परिस्थिती आहे. त्यामुळे मंडळांमध्ये नाराजी आहे. राज्यात इतर महानगरांमध्ये अशाप्रकारे जाहिरात शुल्कावर करमाफी दिली आहे. परंतु, नाशिकमध्ये अजून मंडळांना परवानगीही मिळालेली नाही.
- पोपट नागपुरे, कार्याध्यक्ष, रविवार कारंजा गणेशोत्सव मंडळ (चांदीचा गणपती)
---
गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारण्यासाठी मुंबईला १०० रुपयांपर्यंत आकारणी होत असताना नाशिकमध्ये मात्र ८८६ रुपयांचे शुल्क आकारले जात आहे, त्याचप्रमाणे जाहिरात करही मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे यांसारख्या शहरात १०० रुपये वसूल केला जाणार नाही. मात्र नाशिकमध्ये हा कर ७५ रुपये प्रतिमीटरप्रमाणे आकारण्यात येणार असल्याने मंडळांमध्ये नाराजी आहे.
- गणेश बर्वे, अध्यक्ष, बी. डी. भालेकर गणेशोत्सव मंडळ.
---
महापालिका प्रशासनाने मागील वर्षी ही कर माफीचे आश्वासन दिले होते. परंतु, त्यानुसार कारवाई केली नाही. यावर्षीही तीच परिस्थिती आहे, महापौर एकीकडे मंदिरे उघडण्यासाठी आग्रह करीत असताना दुसरीकडे मात्र गणेशोत्सव मंडळांची अशाप्रकारे कोंडी करीत आहे. त्यामुळे गणेशोत्सव मंडळांमध्ये तीव्र संतापाची भावना असून आश्वासन देऊन कर माफी मिळाली नसल्याने मंडळांची निराशा झाली. त्यामुळे मंडळांनी महापालिका प्रशासनाचा निषेध केला आहे.
- राजेंद्र बागुल, संस्थापक प्रेरणा गणेशोत्सव मंडळ, मेनरोड