पैशांअभावी संताप
By admin | Published: February 9, 2017 10:57 PM2017-02-09T22:57:50+5:302017-02-09T22:58:05+5:30
मऱ्हळ : नाशिक जिल्हा मध्यवर्ती बॅँके वर रोष
निऱ्हाळे : सिन्नर तालुक्यातील मऱ्हळ येथील नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या शाखेतून पैसे मिळत नसल्याने ग्राहकांनी संताप व्यक्त केला आहे. दोन दिवसांत व्यवहार सुरळीत न झाल्यास शाखेस कुलूप ठोकून ग्राहक मंचाकडे तक्रार करण्याचा इशारा खातेदारांनी दिला आहे.
बॅँकेतूनच पैसे मिळत नसल्याने परिसरातील आर्थिक व्यवहार थंडावले असून शेतकरी, ज्येष्ठ नागरिक, मजूर व नोकरदार वर्गाला हकनाक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पैसे मिळण्यास विलंब होत असल्याने बॅँक कर्मचाऱ्यांनाही खातेदारांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.
अनेक ग्राहकांनी डिसेंबर महिन्यात जुन्या नोटांचा भरणा आपल्या खात्यावर केला आहे. मात्र, आत्ता खात्यातून पैसे मिळत नसल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी आहेत. दोन दिवसांत बॅँकेचे व्यवहार
सुरळीत झाले नाही तर मऱ्हळ शाखेस कुलूप ठोकून ग्राहक मंचाकडे तक्रार करण्याचा इशारा खातेदार नवनाथ आढाव, शांताराम कुऱ्हे, तुषार कुऱ्हे, रामदास आष्टेकर, काशिनाथ कुऱ्हे, सूर्यभान माळी, रवींद्र सांगळे यांनी दिला
आहे. (वार्ताहर)