अपक्ष नगरसेवकाच्या प्रवेशावरून गदारोळ
By admin | Published: January 30, 2017 12:17 AM2017-01-30T00:17:57+5:302017-01-30T00:18:10+5:30
शिवसेना कार्यालय : प्रभाग तीसमधील इच्छुकांचा आक्षेप; तिकीट कापायची भीती
नाशिक : शहरातील एका अपक्ष नगरसेवकाने शिवसेनेचा उंबरा चढण्याची तयारी केली असून, काही वरिष्ठ नेत्यांकडून त्या नगरसेवकाची वर्णी लावण्याचा प्रयत्न केला जात असल्याची कुणकुण लागल्यामुळे शिवसेनेच्या एका जुन्या निष्ठावान पदाधिकाऱ्याच्या गटातील इच्छुक उमेदवारांनी आक्षेप घेतला. रविवारी या इच्छुक कार्यकर्त्यांनी आमदार अजय चौधरी यांच्याकडे नाराजी बोलून दाखविली. दरम्यान, इच्छुकांनी यावेळी गोंधळ घातल्याने तिकीट कापाकापीचे नवे ‘वादळ’ उठले आहे.
रविवारी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात शिवसेना कार्यालयात इच्छुकांच्या मुलाखती सुरू होत्या. कार्यालयाच्या वरच्या मजल्यावर शिवसेनेचे नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख आमदार अजय चौधरी, जिल्हाध्यक्ष विजय करंजकर, शहराध्यक्ष अजय बोरस्ते, दत्ता गायकवाड आदि उपस्थित होते. इच्छुकांच्या मुलाखती हे सर्व पदाधिकारी घेत असताना दुपारच्या सुमारास प्रभाग तीस व प्रभाग तेरामधील काही कार्यकर्ते इच्छुकांसमवेत शिवसेना कार्यालयात आले. त्यांनी संबंधित अपक्ष नगरसेवकाला शिवसेनेमध्ये घेऊन यांचे तिकीट कापण्याचा प्रयत्न होत असल्याच्या संशयावरून गोंधळ घातला. अपक्ष नगरसेवकाने शिवसेनेचे इच्छुक उमदेवार म्हणून प्रभागात प्रचारालाही सुरुवात केली असून, शिवसेनेत प्रवेश करून सदर नगरसेवक आपल्या मुलीसाठी उमेदवारी मागत असल्याची जोरदार चर्चा कार्यालयाच्या आवारात होती. सदर अपक्ष नगरसेवकाला काही वरिष्ठ नेते छुपा पाठिंबा देत असल्याचाही आरोप यावेळी करण्यात आला. (प्रतिनिधी)